निर्भयाच्या दोषी आणि त्यांच्या कुटुंबियांचा रडीचा डाव


नवी दिल्ली: निर्भया बलात्कार प्रकरणातील अक्षयकुमार सिंह, पवन गुप्ता आणि विनय शर्मा या तीन दोषींनी फाशीची शिक्षा टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे धाव घेतली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाला दोषींच्या वकिलांकडून पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रामध्ये २० मार्चला दोषींना देण्यात येणाऱ्या फाशीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निर्भया प्रकरणातील सर्व दोषींच्या क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे या दोषींची फाशी निश्चित मानली जात आहे. परिणामी आता रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न या दोषी आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून होताना दिसत आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सर्व दोषींच्या १३ कुटंबीयांनी मिळून पत्र पाठवून इच्छामरणाची मागणी केली आहे. यामध्ये मुकेश सिंह याच्या कुटुंबातील दोन सदस्य, पवन आणि विनय यांच्या घरातील प्रत्येक चार सदस्य आणि अक्षयकुमार सिंह याच्या कुटुंबातील तिघांचा समावेश आहे.

२० मार्चला सकाळी ५.३० वाजता मुकेश कुमार सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंह या चौघांना फाशी देण्यात येणार आहे. यासाठी दिल्ली न्यायालयाकडून डेथ वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर जल्लादाला तिहार तुरुंगात हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यामुळे या चौघांची फाशी निश्चित मानला जात होती. पण आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केल्यास कायदेशीर पेच उभा राहण्याची शक्यता आहे.

Leave a Comment