मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी अवलंबा हे उपाय


आता परीक्षांचे दिवस जवळ आले आहेत. मुलांनी अभ्यास करावा, त्यामध्ये त्यांचे मन एकाग्र व्हावे, या साठी पालक म्हणून आपण सतत प्रयत्नशील असतो. त्यावेळी मुलांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांचा आहार आणि योग्य विश्रांती याच बरोबर अभ्यासासाठी योग्य वातावरण मुलांना मिळेल याची खबरदारी घेणे देखील गरजेचे असते. या शिवाय मुलांची स्मरणशक्ती वाढावी या करिता काही उपाय अवलंबता येतील.

कुठलीही गोष्ट जर पक्की लक्षात राहावी असे वाटत असेल, तर ती ‘व्हिज्युअलाइझ’ करण्याची कल्पना मुलांना पटवून द्यावी. मुले ज्या विषयाचा अभ्यास करीत असतील, त्यातील महत्वाच्या मुद्द्यांशी संबंधित वस्तू डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला, तर त्या गोष्टी लक्षात राहण्यास मदत होते. व्हिज्युअल गेम्स, प्ले कार्ड्स यांच्या मदतीने केलेला अभ्यास चांगला लक्षात राहतो.

आपल्या मुलांना कधी तरी आपले शिक्षक होण्याची संधी द्या. शिक्षकाच्या भूमिकेत शिरल्यानंतर अभ्यासासंबंधी लहान सहान बारकावे तुम्हाला समजवायला सांगा. अश्या रीतीने अभ्यासाची उजळणी कंटाळवाणी न होता रोचक होते आणि रिव्हाईज केलेल्या गोष्टी मुलांच्या अधिक चांगल्या लक्षात राहतात.

मुले वाचत असलेला कंटेंट वेगवेगळ्या रंगांनी हायलाईट करण्यासाठी मुलांना प्रवृत्त करा. कोणती गोष्ट, किंवा धड्याचा कोणता भाग किती महत्वाचा आहे, ते ठरवून त्या दृष्टीने कलर कोडींग करावे. अश्या तऱ्हेचे कलर कोडींग केल्याने माहिती लक्षात ठेवणे काहीसे सोपे होऊन जाते. तसेच वाचलल्या माहितीचे वर्गीकरण केल्याने देखील माहिती लक्षात राहणे सोपे होते. म्हणजेच प्रश्नोत्तरांसाठी धड्यामधील कोणती माहिती विचारली जाणार आहे, ऑब्जेक्टीव्ह प्रश्नांसाठी कोणती माहिती येणार आहे, अश्या निरनिराळ्या वर्गांमध्ये धड्याची विभागणी करावी. असे केल्याने पाठांतर सोपे होईलच, शिवाय वाचलेले लक्षातही राहील.

Leave a Comment