कोरोना : उद्या पहाटेपासून तुळजापूर मंदिर दर्शनासाठी बंद


तुळजापूर: आता हळूहळू देवस्थानांना देखील कोरोना व्हायरसचा फटका बसू लागला आहे. कारण कोरोना व्हायरसचा फटका राज्यातील महत्त्वाचे देवस्थान अशी ओळख असलेले तुळजापूर मदिर संस्थानला देखील बसला आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या सध्या वाढत असल्याने तुळजापूर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून संसर्ग रोखण्यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

कुठल्याही व्हीआयपी व्यक्ती किंवा सामान्य नागरिकाला यामुळे मंदिर दर्शनाचा लाभ घेता येणार नाही. मंदिराचे महंत व पाळीकर पुजारी देवीची पूजा करतील. ४ पेक्षा जास्त पुजारी मंदिरामध्ये उपस्थित राहू शकणार नाहीत. त्याचबरोबर भाविकांविना देवीचे दैनंदिन धार्मिक विधी पार पडणार असून मंदिर प्रशासनाला याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे.

हजारो भाविक रोज तुळजापूर मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी येत असतात. यामध्ये पुणे जिल्ह्यातील भाविकांची संख्या जास्त असते. पुण्यामध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या सध्या जास्त असल्यामुळे काही संशयित रुग्ण जर दर्शनाला आल्यास इतर भाविकांना याची लागण होऊ शकते. त्याच प्रमाणे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून देखील मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने तुळजा भवानीचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, याशिवाय चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे.

पण असे असले तरी लाईव्ह दर्शनाची सोय मंदिर प्रशासनाने उपलब्ध करुन दिली आहे. जिओ लाईव्ह टीव्ही आणि तुळजापूर मंदिर प्रशासनाच्या फेसबुक पेजवर लाइव्ह व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेता येणार आहे. तसेच मंदिर हे पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार आहे.

Leave a Comment