राणी एलिझाबेथला आहेत हे विशेष अधिकार


ब्रिटनची राणी दुसरी एलिझाबेथ हिला राणी म्हणून सर्वाधिकार मिळालेले आहेतच, पण या शिवाय राणीला काही विशेष अधिकारही आहेत. त्याच्याबद्दल थोडेसे..

राणी एलिझाबेथला गाडी चालवण्यासाठी परवाना, म्हणजेच लायसन्सची आवश्यकता नाही. तसेच तिच्या गाडीवर नंबर प्लेट लावणे ही आवश्यक नाही. दुसरे विश्वयुद्ध सुरु असताना राणी एलिझाबेथ ने गाडी चालविण्याचे कौशल्य आत्मसात केले. त्यावेळी राणी ने स्वतः दुसऱ्या विश्वयुद्धात सक्रीय भाग घेतला होता. ‘वुमेन्स ऑक्झीलरी टेरीटोरियल सर्व्हिस’ मध्ये राणीने प्रथमोपचारासाठी वापरले जाणारे ट्रक्स चालविण्याची जबाबदारी उचलली होती. राणी एलिझाबेथ केवळ हे ट्रक्स चालवितच नसे, तर ते नादुरुस्त झाल्यास पुन्हा दुरुस्त करण्याचे कौशल्य देखील तिला अवगत होते.

जगभरात कुठे ही प्रवास करावयाचा असल्यास सामान्य नागरिकांना पासपोर्टची आवश्यकता असते. पण राणी एलिझाबेथ मात्र जगभरामध्ये कोणत्याही देशामध्ये प्रवास करीत असली, तरी तिला पासपोर्टची आवश्यकता नाही. मात्र शाही परिवाराच्या बाकी सदस्यांना मात्र पासपोर्ट आवश्यक आहे. राणी एलिझाबेथ वर्षातून दोन दिवस आपला वाढदिवस साजरा करते. तिचा औपचारिक वाढदिवस २१ एप्रिल रोज साजरा केला जातो, तर अनौपचारिक रित्या तिचा वाढदिवस जून महिन्यात साजरा होतो.

राणीला कधी रोख पैशांची गरज असल्यास तिचे खासगी कॅश मशीन बकिंगहॅम पॅलेसमध्ये इंस्टॉल केलेले आहे. त्यामुळे पैशांची गरज असल्यास राणीला किंवा शाही परिवारातील सदस्यांना बॅंकेत जायची आवश्यकता नाही. राणी एलिझाबेथ ला कॉर्गी जातीच्या कुत्र्यांची अतिशय आवड आहे. या जातीची अनेक क्तुरी राणीकडे आहेत, पण या शिवाय थेम्स नदीतील सर्व हंस, ब्रिटीश अधिपत्याखाली असलेल्या समुद्रांमधील सर्व व्हेल मासे, डॉल्फिन्स आणि स्टर्जन्स राणीच्या मालकीचे आहेत.

राणी एलिझाबेथला तिच्या अफाट संपत्तीसाठी कोणत्याही प्रकारचे कर भरण्याची आवश्यकता नव्हती. पण १९९२ सालापासून राणी ने ब्रिटीश नागरिक म्हणून स्वतःची जबाबदारी उचलत कर भरण्यास सुरुवात केली. राणी एलिझाबेथ आणि शाही परिवारातील सर्व सदस्यांसाठी पोलीस चौकशी माफ आहे. म्हणजेच कोणत्याही कायद्याच्या मामल्यामध्ये आपली खासगी माहिती देण्यास शाही परिवाराचे सदस्य नकार देऊ शकतात.

राणी एलिझाबेथ चर्च ऑफ इंग्लंडची प्रमुख आहे. म्हणजेच तिला इतर कोणत्याही धर्माचा, किंबहुना इतर कोणत्याही चर्चचा स्वीकार करण्याची सूट नाही. जर तिने असे केले, तर तिला राजगादीवरून हटवून दुसरा राजा किंवा राणी नियुक्त करण्याचा अधिकार चर्चला आहे.

Leave a Comment