विधानसभा अध्यक्षांनी भरला गिरीश महाजन यांना दम


मुंबई – ‘सीएए’च्या मुद्यावरून विधीमंडळात सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार गदारोळ झाला. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांना सभागृहाबाहेर काढण्याचा दम दिला. भाजप आमदार गिरीश महाजन सांगूनही टिप्पणी करत होते. नाना पटोलेंनी त्यावेळी ‘गिरीश तुला बाहेर काढू का? असे म्हणत त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. सभागृह पटोलेंच्या या पवित्र्यानंतर मात्र काही मिनिटे का होईना शांत राहिले.

सभागृहात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान झालेला गदारोळ माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या भाषणापासून वाढला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री नवाब मलिक यांच्या नावांचा उल्लेख मुनगंटीवारांनी केल्याने सत्ताधारी पक्षाचे विशेषतः राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार आक्रमक झाले. तेवढ्यात विरोधी भाजपचेही आमदार समोरासमोर आल्याने सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला.

पटोले वारंवार आमदार आपल्या जागेत बसावे, शांत रहावे, अशा सूचना करीत होते; तरी देखील सर्व आमदार गोंधळ घालत अनेकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देत होते. त्यानंतर आपल्या जागेत उभे राहून पटोले म्हणाले, हे मी आता खपवून घेणार नाही. गोंधळ घालणाऱ्या आमदारांना बाहेर काढेन, असा इशारा पटोलेंनी दिला.

नाना पटोलेंच्या सुचनेनंतरी पुढच्या बाकांवर बसलेले गिरीश महाजन काही तरी बोलत होते. तेव्हाच महाजनांकडे नजर वळून गिरीश तुला बाहेर काढू का, असा दमच पटोलेंनी महाजनांना भरल्यानंतर सभागृह काही काळ शांत झाले. पण, काही वेळाने पुन्हा आरोप-प्रत्यारोपाने गदारोळ झाला. अर्ध्या तासासाठी कामकाज थांबविण्याचा निर्णय घेत पटोले आपल्या दालनात गेले.

Leave a Comment