पोळी किंवा भात, वजन कमी करण्यासाठी काय खावे?


भारतीय भोजनाचा विषय निघाला, की नाना पदार्थ मनामध्ये येऊन तोंडाला पाणी सुटते. चिकन, मटन, पनीर, भाज्या, पालेभाज्या, कडधान्ये, डाळी, पोळ्यांचे आणि भाताचे अनेक प्रकार एक ना अनेक..असे कितीतरी प्रकार आपल्या आहारामध्ये समाविष्ट असतात. पोळी आणि भात आपल्या आहाराचे प्रमुख घटक आहेत. कर्बोदके आणि कॅलरिज भरपूर प्रमाणात असलेले हे दोन्ही पदार्थ भारतामध्ये घराघरामध्ये आवडीने खाल्ले जातात. ज्या व्यक्तींना वजन कमी करायचे असेल, त्यांना आहारातील कर्बोदके कमी करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे कर्बोदकांचे प्रमुख स्रोत असलेले पोळी आणि भात एकदम सोडून दिले जातात. परिणामी शरीरामध्ये काही अंशी अशक्तपणा येऊ शकतो. पोळी खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते, आणि वारंवार भूक लागत नाही, तर भात पचण्यास हलका असतो. त्यामुळे वजन कमी करणाऱ्या व्यक्तींनी पोळी खावी किवा भात ह्याचा विचार करणे अगत्याचे ठरते.

पोळीमध्ये पौष्टिक तत्वे जास्त असतात. पण या मध्ये सोडियम देखील जास्त प्रमाणात असते. १२० ग्राम गव्हाच्या पीठामध्ये १९० मिलीग्राम सोडियम असते. पण भातामध्ये सोडियम अजिबात नाही. त्यामुळे सोडियम चे प्रमाण आहारातून कमी करावयाचे असल्यास पोळ्यांचे सेवन कमी करावे. पण भातामध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. त्यामुळे भात पचण्यासाठी हलका असतो. त्यामुळे एकदा खाल्लेला भात पचला, की लगेच भूक लागते. गव्हामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पोळी खाल्ल्यानंतर बऱ्याच वेळेपर्यंत पोट भरलेले राहते. त्यामुळे वारंवार खाणे टाळता येते.

गव्हामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, फॉस्फोरस असल्याने त्यामधून पोषण मिळते. पण भातामध्ये स्टार्च आणि कॅलरीज जास्त मात्रेमध्ये असतात. भातामध्ये कॅल्शियम, लोह इत्यादी पोषक पदार्थ नाहीत. पोळीमध्ये फायबर असल्याने ती पचण्यास वेळ लागतो. त्यामुळे ब्लड शुगर सामान्य राहण्यास मदत होते. पोळी असो किंवा भात, हे दोन्ही पदार्थ प्रमाणामध्ये खाल्ले तर आरोग्यास चांगले आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment