दोरीवरच्या उड्यांच्या (स्किपींग) सहायाने वजन करा कमी


जर तुम्हाला वजन घटविण्यासाठी नियमितपणे व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जाण्यास वेळ नसेल, तर घरच्याघरी दोरीवरच्या उड्या मारणे हा चांगला पर्याय असू शकतो. सतत दहा मिनिटे दोरीवरच्या उड्या मारल्याने सुमारे शंभर कॅलरीज खर्च होतात. यासाठी तुम्ही घरामध्ये, एखाद्या पार्कमध्ये, किंवा कोणत्याही मोकळ्या ठिकाणी हा व्यायामप्रकार करू शकता. या साठी तुम्हाला एका चांगल्या प्रतीच्या स्किपींग रोपची व तुम्हाला आरामदायी वाटतील अश्या स्पोर्ट्स शूजची आवश्यकता आहे.

या कसरतीमुळे ओस्टीटोपोरोसीस सारखे आजार उद्भविण्याचा धोका कमी होऊन हाडांचा क्षय होण्याचे प्रमाण कमी होते, व हाडे मजबूत बनतात. दहा मिनिटे स्किपींग केल्याने तितकाच फायदा होतो, जितका अर्धा तास जॉगिंग केल्याने किंवा पंधरा मिनिटे धावल्याने होतो. स्किपींग हा एक अतिशय उत्तम एरोबिक पद्धतीचा व्यायाम आहे. या व्यायामप्रकारामुळे संपूर्ण शरीराला मुबलक व्यायाम मिळतो. या व्यायामामुळे वजन कमी होऊन हातापायांच्या स्नायूंचे चांगले ‘टोनिंग’ होते. नियमितपणे हा व्यायाम केल्याने शरीराचे एकंदर आरोग्य तर सुधारतेच, शिवाय मनाची एकाग्रता वाढण्यासही मदत होते. या व्यायामामुळे फुफ्फुसांचे आरोग्य चांगले होऊन फुफ्फुसे बळकट होतात व स्टॅमिना देखील वाढतो. या मुळे हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहते.

स्किपींग मुळे हाडांचे घनत्व वाढते, तसेच शरीराच्या चयापचयामध्ये सुधारणा होते. तसेच पायांचे स्नायू, गुडघे आणि टाचांच्या मजबुतीकरिता हा व्यायामप्रकार अतिशय उत्तम आहे. नियमितपणे स्किपींग केल्याने डोळे, हात आणि पाय यांच्या हालचालींचा उत्तम समन्वय साधता येतो. हा व्यायामप्रकार दिवसातून पंधरा ते वीस मिनिटे करायला हवा. या पेक्षा जास्त वेळ दोरीवरील उड्या मारल्याने गुडघ्यांना दुखापत होण्याची शक्यता असते.

दोरीवरच्या उड्या मारताना हात पाय आणि डोळे यामध्ये योग्य समन्वय असणे आवश्यक आहे. यासाठी हाता-पायांच्या हालचालींमध्ये ट्युनिंग असायला हवे. जर तुम्ही प्रथमच स्किपींग करीत असाल, तर याचा सराव होण्यास काही वेळ लागू शकतो. त्यामुळे सुरुवातीला केवळ पन्नास ते शंभर रीपिटीशन करावीत. हळू हळू जसा सराव वाढेल तशी ही संख्या वाढवत जावी. तसेच स्किपींग करताना सपाट जमिनीवर करावे. खडबडीत जमिनीवर स्कीपिंग केल्यास सांध्यांवर ताण येऊ शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment