स्वप्नील जोशीच्या पहिल्या वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज


डिजिटल विश्वाकडे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशीने आपला मोर्चा वळवला आहे. स्वप्नीलने आजवर मालिका आणि चित्रपटांमधून दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तो आता पहिल्यांदाच वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सिरीजचे ‘समांतर’ असे नाव आहे. नुकताच या वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

या वेब सिरीजमध्ये एखाद्या व्यक्तीचा भूतकाळ हा आपला भविष्यकाळ ठरणार असल्याचे समजताच त्या व्यक्तीला शोधण्यासाठी निघालेल्या कुमार महाजनची कथा दाखवण्यात येणार आहे. या ट्रेलरमध्ये सुदर्शन चक्रपाणी नावाच्या व्यक्तीचा भूतकाळ हेच आपले भविष्य आहे, हे समजल्यानंतर आपले भविष्य आणि त्या व्यक्तीला शोधण्यासाठी कुमारचे आयुष्य कसे बदलते, याची झलक पाहायला मिळते.

यामध्ये स्वप्नीलसोबत अभिनेत्री तेजस्विनी पंडितचीही मुख्य भूमिका आहे. 9 भागांची ही वेब सिरीज सतिश राजवाडे यांनी दिग्दर्शित केली आहे. ही वेब सिरीज मराठीसोबतच हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही पाहता येणार आहे. 13 मार्चला एम एक्स प्लेअर वर ही सिरीज रिलीज करण्यात येणार आहे. या सिरीजच्या ट्रेलरची लिंक स्वप्नीलने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

Leave a Comment