ड जीवनसत्व आणि कॅल्शियमचे सप्लिमेंट्स घेतल्याने फ्रॅक्चर्स टाळता येऊ शकतात का?


हाडांचे आरोग्य चांगले राहावे या करिता कॅल्शियम च्या सप्लिमेंट आपण घेतो, आणि आपण घेत असलेले कॅल्शियम शरीरामध्ये शोषले जावे या करिता ड जीवनसत्वाचे सप्लिमेंट देखील आपण घेत असतो. ही दोन्ही तत्वे आपल्या शरीरातील हाडांच्या आरोग्याच्या दृष्टीने जरी महत्वाची असली, तरी प्रसंगी एखाद्या लहानश्या अपघातामुळे किंवा पडल्याने होणारी हाडांची फ्रॅक्चर्स या सप्लिमेंट्स मुळे टाळता येऊ शकत नसल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधात म्हटले आहे. हा शोधनिबंध जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन तर्फे प्रसिद्ध करण्यात आला आहे.

ज्या व्यक्तींना ऑस्टीयोपोरोसीस आहे, म्हणजेच ज्या व्यक्तींची हाडे ठिसूळ झालेली आहेत, त्यांची हाडे अगदी लहानशा अपघाताने देखील फ्रॅक्चर होऊ शकतात. हाडांची झीज कमी व्हावी याकरिता अश्या व्यक्तींना कॅल्शियम आणि ड जीवनसत्वाची सप्लिमेंट दिली जातात. पण ह्या सप्लिमेंट चा उपयोग फ्रॅक्चर होण्यासाठी कितपत होऊ शकतो या बद्दल शास्त्रज्ञांच्या मिश्र प्रतिक्रिया आहेत. या अनुषंगाने चीनमधील तिआनजिन हॉस्पिटलमधील शास्त्रज्ञांनी एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाअंतर्गत, पन्नास वर्षे वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या वृद्ध व्यक्तींचे निरीक्षण करण्यात आले. या सर्व व्यक्ती ड जीवनसत्व व कॅल्शियम सप्लिमेंट घेणाऱ्या होत्या. या व्यक्तींच्या चाचण्या करण्यात येऊन, त्याद्वारे हे निदान करण्यात आले, की ड जीवनसत्व व कॅल्शियमच्या सप्लिमेंट घेऊन देखील या व्यक्तींना एखाद्या इजेमुळे हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यता होती.

ड जीवनसत्व आणि कॅल्शियम यांचे सप्लिमेंट हाडांची झीज नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त असले, तरी एखाद्या इजेमुळे होणारे फ्रॅक्चर या दोन्ही तत्वांमुळे टाळता येऊ शकतेच असे नाही, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment