‘बधाई हो 2’मध्ये पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार भूमी आणि राजकुमार


आयुष्मान खुराणा, नीना गुप्ता आणि गजराज राव यांच्या बधाई हो या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रग्गड कमाई केल्यानंतर गेल्या बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा होती. पण या चर्चेवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. बधाई हो 2 या सिक्वेलमध्ये राजकुमार राव मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. राजकुमार रावसोबत या चित्रपटात भूमी पेडणेकर देखील झळकणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून हे दोघेही पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या बधाई हो या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रविचंद्रन शर्माने केले होते आणि आता या चित्रपटाचे दिग्दर्शन हर्षवर्धन कुलकर्णी करणार आहे. त्याने यापूर्वी गुलशन देवय्या अभिनित ‘हंटर’ची निर्मिती केली आहे.

एका वयस्कर महिलेच्या गरोदरपणावर चित्रपटाच्या मागील भागाचे कथानक आधारित होते. आता यामध्ये बदल आहे. यामध्ये राजकुमार राव अशा एका पोलिस स्टेशनमधील पोलिस निरीक्षकाची भूमिका साकारणार आहे, ज्या ठाण्यात हवालदारपासून ठाणेदार आणि कॉन्स्टेबल सर्व महिला आहेत आणि त्या पोलिस स्टेशनचे नावदेखील महिला ठाणे आहे. भूमी यात एका तणावग्रस्त पीटी शिक्षिकेची भूमिका साकारत आहे. राजकुमार आणि भूमी एकमेकांच्या आयुष्यात येतात आणि आपआपल्या भूमिकेची अदलाबदल करतात. त्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते त्यावर हा चित्रपट पुढे सरकतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर यात संबंध आणि त्यामध्ये दिलेल्या वचनांनाबाबत दाखविले जाणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी सुरुवातीलाच प्रदर्शित होईल.

Leave a Comment