पी. व्ही. सिंधू ‘बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर’

भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूला बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2019 च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जगभरातील चाहत्यांची मते आणि प्रतिष्ठित ज्यूरींद्वारे नामांकित 5 स्पर्धांपैकी सिंधूची निवड करण्यात आली.

हा पुरस्कार स्विकारल्यानंतर सिंधू म्हणाली की, मी बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर टीमचे आभार मानते. हा पुरस्कार मिळाल्याने मी आनंदी आहे. बीबीसी इंडियाचा हा शानदार उपक्रम आणि माझ्या सर्व चाहत्यांचे आभार मानते.

सिंधूने आपला हा पुरस्कार चाहत्यांना समर्पित केला. सिंधूच्या नावे एकूण 5 जागतिक चॅम्पियनशीप पदक आहेत. ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी ती एकमेव बॅडमिंटनपटू देखील आहे. मागील 4 वर्षात ती टॉप 10 खेळाडूंमध्ये कायम आहे.

या पुरस्कारासाठी फेब्रुवारी महिन्यात 5 खेळाडूंना नामांकित करण्यात आले होते. यामध्ये धावपटू दूती चंद, बॉक्सिंगपटू मेरी कॉम, कुस्तीपटू विनेश फोगाट, पॅरा बॅडमिंटनपूट मानसी जोशी आणि पी. व्ही. सिंधूचा समावेश होता.

याशिवाय भारताचे नाव उंचावणाऱ्या अ‍ॅथलीट पीटी उषा यांना खेळातील योगदान व इतर खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. पीटी उषा यांनी आपल्या करिअरमध्ये 100 पेक्षा अधिक पदके मिळवली आहेत.

या पुरस्कार सोहळ्यावेळी केंद्रीय क्रिडामंत्री किरण रिजिजू यांच्यासह अनेक खेळाडू, पत्रकार, मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment