साखरेच्या ऐवजी मिठाई बनविताना वापरा खजुराची पेस्ट


आपल्या दैनंदिन आहारामध्ये साखरेचा वापर होत असतो. चहा, कॉफी, आणि मुख्य म्हणजे आपल्या आहारातील बहुतेक सर्वच गोड पदार्थांमध्ये साखरेचा वापर नियमित केला जात असतो. केवळ घरी तयार करण्यात आलेल्या पदार्थांतच नव्हे, तर ब्रेड, बिस्किटे, तयार सॉसेस, सँडविच स्प्रेड्स, पॅकेज्ड फळांचे रस, कोल्ड ड्रिंक्स यांमध्येही साखरेचे प्रमाण जास्त असते. रिफाईन्ड साखर अतिप्रमाणात खाल्ल्याने आरोग्याला धोका निर्माण होत असून, तरुण वयातच उच्च रक्तदाब, मधुमेह, इत्यादी विकार उद्भवण्याचे प्रमाण वाढले आहे. आहारामध्ये साखर जास्त असल्याने चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येणे, वारंवार मुरुमे पुटकुळ्या येणे, इत्यादी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळेच आहारतज्ञ दैनंदिन आहारामधून साखरेचे प्रमाण कमी करून साखरेच्या ऐवजी नैसर्गिक स्वीटनर्स वापरण्याचा सल्ला देत असतात. नैसर्गिक स्वीटनर्समध्ये अनेक पर्याय उपलब्ध असून त्यामध्ये खजुराच्या पेस्टचा समावेश करता येऊ शकतो.

खजूराची विशेषता अशी, की त्यामध्ये नैसर्गिक शुगर्ससोबत प्रथिने, फायबर, झिंक, मॅग्नेशियम, इत्यादी क्षारही आहेत. शंभर ग्राम खजुरामध्ये २८२ किलो कॅलरीज इतकी उर्जा असते. त्यामुळे खजुरापासून तयार केली गेलेली पेस्ट किंवा सिरप रिफाईन्ड साखरेच्या ऐवजी वापरले जाऊ शकते. खजुराची पेस्ट घरच्याघरी तयार करण्यासाठी केवळ खजूर आणि स्वच्छ पाणी, इतक्याच साहित्याची आवश्यकता आहे. खजुराची पेस्ट बनविण्यासाठी ताजा पिकेलेला खजूर पाण्यामध्ये भिजवून ठेवावा. खजूर भिजविण्याआधी त्याच्यातील बिया काढून टाकाव्यात. त्यानंतर गरम पाण्यामध्ये खजूर भिजवावा. हा खजूर रात्रभर पाण्यामध्ये भिजू द्यायचा आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी खजूर पाण्यातून काढून घेऊन मिक्सरवर बारीक वाटावा. खजूर भिजवून ठेवलेले पाणी टाकून न देता हे पाणी खजूर मिक्सरवर वाटत असताना घालावे. आवश्यक तितके पाणी घालून आपल्याला हवी तितकी घट्ट किंवा पातळ पेस्ट तयार करून घ्यावी. या पेस्ट मध्ये किंचित मीठ, आवडत असल्यास मध, किंवा दालचिनीची पूड मिसळता येईल. यामुळे या पेस्टला आगळीच चव येते. खजुराचे सिरप तयार करण्यासाठी खजूर पाण्यामध्ये उकळून घ्यावेत. त्यानंतर खजूर उकळलेले पाणी गाळून घेऊन खजुराचा गर वेगळा करावा. गाळलेले पाणी पुन्हा उकळत ठेऊन पाकाप्रमाणे दिसेपर्यंत आटवावे. तयार झालेले सिरप थंड झाल्यावर बाटलीमध्ये भरून ठेवावे. खजुराच्या सिरपपेक्षा खजुराची पेस्ट अधिक चांगली, कारण या पेस्टमध्ये फायबर असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment