येस बँकेचा ग्राहकांना दिलासा


मुंबई – सध्या कर्ज घोटाळ्यामुळे आर्थिक अडचणी आलेल्या येस बँकेच्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण असून ईडीने या संपूर्ण प्रकरणात बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक केली आहे. दरम्यान येस बँकेच्या ग्राहकांना हा आर्थिक गैरव्यवहार समोर आल्यानंतर पैसे काढताना समस्यांना सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री बँकेने अखेर ग्राहकांना दिलासा दिला आहे.

येस बँकेने केलेल्या कर्जवाटपात घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर बँकेची आर्थिक अनियमितता चव्हाट्यावर आल्यानंतर शुक्रवारी रात्री ईडीने बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर आणि संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. ईडीने या कारवाईनंतर राणा कपूर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची शनिवारी दिवसभर चौकशी करण्यात आली. कपूर यांना दीर्घकाळ चाललेल्या चौकशीनंतर शनिवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार कपूर यांना अटक करण्यात आली आहे.


दरम्यान, बँकेने शनिवारी रात्री चिंतातूर असलेल्या आपल्या ग्राहकांना काहीसा दिलासा दिला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर बँकेने एक ट्विट केले आहे. येस बँकेचे डेबिट कार्ड वापरून तुम्ही आता पैसे काढू शकता. येस बँकेच्या एटीएमबरोबरच इतर बँकांच्या एटीएममधूनही पैसे काढता येईल. संयम दाखवल्याबद्दल आभारी असल्याचे ट्विटमध्ये बँकेने म्हटले आहे.