एप्रिलमध्ये अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन : स्वामी गोविंदगिरी


अहमदनगर: श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी आज अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन येत्या ३० एप्रिल रोजी करण्याचा विचार असल्याची माहिती दिली. अयोध्येत येत्या ४ एप्रिल रोजी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची बैठक होणार असून भूमिपूजनाबाबतचा निर्णय त्यावेळी होणार घेण्यात येणार आहे. पण भूमिपूजन सोहळा ३० एप्रिल रोजीच पार पडेल, अशी आजची स्थिती असल्याचेही स्वामी म्हणाले.

पूर्णपणे वैदिक पद्धतीने श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होणार असून या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचेही स्वामींनी सांगितले. सध्याचा जो श्रीराम जन्मभूमी मंदिराचा आराखडा आहे तो ९०% स्वीकारला गेला आहे. त्यात अजून मंदिराची भव्यता करण्याचे नियोजन आहे. मंदिर उभारणीचे तीन वर्षात लक्ष्य आहे. यासाठी लवकरच निधी संकलन सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मंदिर न्यासाचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अयोध्या शाखेमध्ये खाते उघडल्यानंतर निधी संकलन सुरू होईल. अयोध्येतील राम मंदिर पूर्णपणे पाषाणात होणार असून भारतीय संस्कृतीचे संस्कार केंद्र व विश्व संस्कार राजधानी म्हणून या निमित्ताने अयोध्येचा विकास करण्याचे मंदिर न्यास समितीचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment