केंद्राच्या जॉब पोर्टलवर 1 कोटी बेरोजगारांनी मागितला रोजगार

केंद्र सरकारच्या जॉब पोर्टलवर आतापर्यंत 1 कोटींपेक्षा अधिक बेरोजगार युवकांनी नोकरीच्या मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. यातील 67.99 लाख नोकऱ्यांची सूचना पोर्टलवर दिली आहे. यातील किती नोकऱ्या नोंदणीकृत बेरोजगारांना मिळाल्या आहेत, याची आकेडवारी सरकारच्या पोर्टलवर उपलब्ध नाही.

कामगार व रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना या संदर्भात स्पष्ट केले की, नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलद्वारे किती लोकांना नोकरी मिळाली या संदर्भातील आकडे जमा केले जात नाहीत. या पोर्टलवर रजिस्टर्ड नोकरी आणि नोंदणीकृत बेरोजगारांची आकडेवारी असते.

2015 मध्ये कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलची सुरूवात केली होती. या पोर्टलवर बेरोजगार आपली माहिती व शैक्षणिक माहिती देऊन नोंदणी करतात. तसेच नोकऱ्या देणाऱ्या कंपन्या येथे रजिस्ट्रेशन करतात.

2015-16 या पहिल्या वर्षी पोर्टलवर 1 लाख 47 हजार 780 नोकऱ्यांची माहिती देण्यात आली होती. तर 32 लाख 32 हजार 916 बेरोजगारांनी नोकरीची मागणी केली होती. त्यावर्षी केवळ 559 कंपन्या येथे रजिस्टर्ड होत्या. 2019-20 या वर्षात बेरोजगारांची नोंदणी 1 कोटींच्या वर गेली. तर नोकऱ्यांची संख्या 67,99,117 होती. सध्या 1 कोटी 4 लाख 54 हजार 808 बेरोजगार आहेत, तर 3 लाख 26 हजार 308 नोकऱ्या उपलब्ध आहेत.

Leave a Comment