
मुंबई : भाजपच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शौचालयाला देऊन उद्घाटन केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडेंनी राज्याचा विरोधी पक्ष असलेल्या भाजप आमदारांवर हल्लाबोल करत भाजपचे लोक डोक्यावर पडली आहेत का?’ असा सवाल विचारणारे ट्विट केले आहे.
4 मार्च 2020 रोजी मुंबईतील भाजप आमदार प्रसाद लाड यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी यामध्ये एका अद्ययावत शौचालयाच्या उद्घाटन प्रसंगाचे फोटो शेअर केले आहे. त्यांनी या शौचालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले आहे आणि यामुळेच भाजप नेत्यांवर मनसेने टीका केली आहे.
भाजप आमदारांनी शौचालयाला दिले चक्क शिवछत्रपतींचे नाव
ही लोक डोक्यावर पडली आहेत का ?छत्रपती शिवाजी महाराजांच नाव शौचालयाला??? https://t.co/KGD3PjkuHR
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 5, 2020
या शौचालयाला ‘छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय केंद्र’ असे नाव दिले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते आणि छत्रपती शिवाजी महाराज बहुउददेशीय केंद्राचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्तेच पार पडल्याचे नमूद करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला भाजप आमदार आशिष शेलार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार कालिदास कोळमकर आणि भाजप नेते तमिल सेलवन हे देखील उपस्थित होते. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या नावावरून टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये संदीप देशपांडे म्हणतात की, भाजपची लोक डोक्यावर पडली आहेत का ? शौचालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ? या ट्विटमुळे भाजपवर जोरदार टीका सोशल मीडियातून देखील होत आहे.
