तुमचे केस-तुमच्या आरोग्याचा आरसा


तुमच्या केसांवरून तुमचे आरोग्य कसे आहे याचा अंदाज बांधता येऊ शकतो. केस गळणे किंवा केस पातळ होणे हे मोठ्या समस्येचे सूचक असू शकते. तज्ञांच्या मते तुमच्या केसांची स्थिती तुमच्या आरोग्याबद्दल बरेच काही सांगू शकते. कारण आपल्या केसांतील ‘मायक्रोसर्क्युलेशन’, आपल्या शरीरातील हॉर्मोन्स च्या संतुलनावर आणि शरीराला मिळणाऱ्या पोषणावर अवलंबून असते. आपले केस, अगदी सूक्ष्म प्रमाणात का होईना, पण आपल्या शरीरातील कमतरता दर्शवित असतात.

केस गळणे आणि त्याजागी नवीन केस येणे ही प्रक्रिया नैसर्गिक आहे. त्यामुळे दररोज ऐंशी ते शंभर केस गळणे ही सामान्य बाब आहे. पण केसगळती जेव्हा यापेक्षा जास्त होऊ लागते, तेव्हा शरीरामध्ये असणाऱ्या कोणत्यातरी कमतरतेमुळे केस गळत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्यामागे अनेक तऱ्हेची कारणे असू शकतात. अनुवांशिकता, एखादा आजार, शरीरामध्ये असणारी लोहाची कमतरता, मानसिक किंवा शारीरिक तणाव, किंवा हवामानातील बदलामुळे ही केस प्रमाणाबाहेर गळू शकतात. थायरॉइड च्या असंतुलनामुळेही केस गळू शकतात. तसेच प्रसूतीनंतरह महिलांमध्ये केस गळतीचे प्रमाण वाढते. ही केसगळती रोखण्यासाठी शरीराला लोहाची आवश्यकता असते. शरीरामध्ये हिमोग्लोबिन सामान्य असले, तरी लोहाची कमतरता असू शकते. अनेकदा शरीराला प्रथिनांचे पोषण न मिळाल्यामुळे देखील केसगळती उद्भवू शकते. त्यामुळे जर मोठ्या प्रमाणावर केस गळती होत असेल, तर रक्ताची तपासणी करून घेऊन शरीरामध्ये कोणत्या पोषक घटकाची कमतरता आहे, हे समजून घेता येते, तसेच आहारतज्ञांचा साला घेऊन आपल्या आहारामध्ये सुधारणा करून घेऊन शरीराला आवश्यक ते पोषण मिळेल याची काळजी घेता येऊ शकते.

जर दाट असेलेले केस पातळ होत चालले असतील, तर तुमची जीवनशैली याला जबाबदार असू शकते. वारंवार केसांवर करविल्या जाणाऱ्या रासायनिक ट्रीटमेंट, केसांची अपुरी निगा, हॉर्मोन्स चे असंतुलन, आणि पोषणाची कमतरता या कारणांमुळे केस पातळ होऊ लागतात. वाढत्या वयानिशी देखील केसांचा दाटपणा कमी होत जातो. केस पातळ होण्यामागे नक्की कोणते कारण असू शकेल हे जाणून घेण्याकरिता अनेक प्रकारच्या तपासण्या उपलब्ध आहेत. एकदा कारण स्पष्ट झाले की मग त्यावर उपाययोजना करणे शक्य होते.

जर डोक सतत खाजत असेल, किंवा स्काल्प सतत खपल्या धरल्याप्रमाणे दिसत असेल, तर हे लक्षण सीबम कमी होत असल्याचे आहे. हे लक्षण एक्झिमा किंवा सोरायसिसचे देखील असू शकते. सततचा मानसिक तणाव, शारीरीक थकवा, किंवा हेअर प्रोडक्ट्स चा अतिवापर या मुळे ही समस्या उद्भवू शकते. शरीरामध्ये लोहाची कमतरता असल्यास ही डोके खाजणे, स्काल्पवर खपल्या धरणे अश्या तक्रारी उद्भवू शकतात. ह्याकरिता तज्ञांच्या सल्ला घेणे, व त्याप्रमाणे औषधोपचार करणे आवश्यक आहे.

जर केसांमध्ये स्प्लीट एन्ड्स होत असतील, म्हणजेच केस जर टोकाशी दुभंगत असतील, तर हे रोखण्याकरिताही उपचारांची गरज आहे. केस दुभंगण्याची अनेक करणे असू शकतात. हेअर स्टायलिंग करताना हिट प्रोटेक्टंट चा वापर न करता हिट ट्रीटमेंट करविणे, ब्लो ड्रायरचा अतिवापर, केसांमध्ये आर्द्रतेची कमतरता, या मुळे केस टोकांशी दुभंगताना आढळतात. तसेच केस रुक्ष किंवा अतिशय कोरडे असणे, हे हॉर्मोन्स च्या असंतुलनाचे लक्षण असू शकते. ह्यावर तज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना करता येते. केस अकाली पांढरे होणे हे शरीरामध्ये ब जीवनसत्वाच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. तसेच थायरॉइड मधील असंतुलनामुळे देखील केस अकाली पांढरे होऊ शकतात. ह्या समस्यांचे निदान जर योग्य वेळी झाले, तर आवश्यक ते औषधोपचार करून या समस्या संपुष्टात आणता येऊ शकतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment