आरोग्यमंत्र्यांची कबुली; भारतात 28 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त


नवी दिल्ली : चीनसह जगभरातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे भारतातही दहशतीचे वातावरण असून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील कोरोना व्हायरसग्रस्त रुग्णांची संख्या 28 वर पोहोचल्याची माहिती दिली आहे. भारतात इटलीमधून पर्यटनासाठी आलेल्या एका ग्रुपमधील 16 जण कोरोनाग्रस्त असून त्यांच्या संपर्कात आलेला आणि त्यांच्यासोबत असलेला एक भारतीय चालकही कोरोनाबाधित आहे. त्याचबरोबर दिल्लीत एक, हैदराबादमध्ये एक आणि आग्र्यातील सहा जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. आग्र्यातील सहा जणांना कोरोना व्हायरसची लागण दिल्लीतील व्यक्तीच्या संपर्कात आल्यानेच झाल्याचे समोर आले आहे. हे सहा जण त्या व्यक्तीचे नातेवाईक आहेत.

आज वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बैठक घेतली आणि कोरोनाचा सामना करण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतला. कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी सध्या 15 प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. सरकारकडून आणखी 19 प्रयोगशाळांची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे. त्याचबरोबर परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची आता कसून तपासणी केली जात आहे. याआधी केवळ 12 देशांसाठी अॅडव्हायझरी जारी केली होती.

चांगल्या दर्जाचे स्वतंत्र वॉर्ड तातडीने बनवण्याचे आदेश देशातील सर्व रुग्णालयांमध्ये देण्यात आले आहेत. याआधीही रुग्णालयांना हा आदेश देण्यात आला होता. अनेक रुग्णालयांना सहसचिव स्तराच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आणि त्यांनी तिथे स्थापन केलेल्या सुविधांचा आढावा घेतल्याची माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, तीन हजारांपेक्षा जास्त चाचण्या भारतात झाल्या आहेत. आधीच 15 चाचणी प्रयोगशाळा बनवण्यात आल्या होत्या. आणखी 19 बनवण्यात आल्या आहेत, तर आठ प्रयोगशाळा काल सुरु झाल्या असून काही आज सुरु होतील.

Leave a Comment