
मुंबई: भारतीय जनता पक्षाने नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ठराव मांडणाऱ्या महाराष्ट्रातील दोन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. CAA, NRC आणि NPR विरोधात परभणीच्या पालम नगरपरिषदेतील उपनगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे आणि सेलू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी आपापल्या नगरपरिषदांमध्ये ठराव संमत करून घेतला होता. हा ठराव त्यांनी केंद्र सरकारकडेही पाठवल्यानंतर त्यांच्यावर महाराष्ट्र भाजपकडून तात्काळ कारवाई करण्यात आली आहे.
CAAला विरोध करणाऱ्या नेत्यांची भाजपमधून हकालपट्टी
रोकडे व बोराडे यांच्या हकालपट्टीचे पत्रक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जारी केले आहे. रोकडे व बोराडे यांनी CAAच्या विरोधात प्रस्ताव आणून पक्षविरोधी कृत्य केले आहे. ही कृती शिस्तभंग करणारी असल्याने त्यांना पक्षातून काढण्यात येत असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.
आपापल्या नगरपरिषदांमध्ये बाळासाहेब रोकडे आणि विनोद बोराडे यांनी CAA, NRC आणि NPR विरोधात ठराव मांडून ते मंजूर करवून घेतले. हा प्रकार भाजपचीच सत्ता असलेल्या नगरपरिषदांमध्ये घडल्याने पक्षाची चांगलीच नाचक्की झाल्यामुळे महाराष्ट्र भाजपकडून या दोन्ही नेत्यांना तात्काळ बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
