आता मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचाही पाच दिवसांचा आठवडा


मुंबई : बृह्नमुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांनाही पाच दिवसांचा आठवडा लागू होण्याचा मार्ग पालिका आयुक्तांच्या मंजुरीनंतर मोकळा होणार आहे. राज्य सरकारच्या धर्तीवर महापालिका कर्मचाऱ्यांनाही आता प्रत्येक शनिवार-रविवार सुट्टी मिळण्याचे चित्र आहे.

त्या संदर्भातील परिपत्रक महापालिकेच्या कामगार विभागाने प्रसिद्ध केले असून आता त्यावर पालिका आयुक्तांची स्वाक्षरी होण्याची औपचारिकता बाकी आहे. या परिपत्रकानुसार अत्यावश्यक सेवा वगळून कार्यालयीन कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा लागू करण्यात येणार आहे.

राज्य सरकारसोबतच निमशासकीय आणि महापालिका कर्मचाऱ्यांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून पाच दिवसांचा आठवडा केला जावा, अशी मागणी केली जात होती. राज्य सरकारने या मागणीनुसार 24 फेब्रुवारी रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्याची 29 फेब्रुवारीपासून अंमलबजावणी केली गेली.

आता सोमवार ते शुक्रवार सरकारी कार्यालये खुली राहणार असून शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सरकारी कार्यालय बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे पालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीनंतर महापालिका कर्मचाऱ्यांनाही वीकेंडला सुट्टी मिळणार आहे.

ज्या कर्मचाऱ्यांना आधी दुसरा आणि चौथा आठवडा सुट्टीचा फायदा मिळत होता अशाच अधिकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्यामुळे शनिवार आणि रविवार या दिवशी पालिकेचे मुख्यालय आणि इतर प्रशासकीय कार्यालये बंद राहणार आहेत.

पालिका कर्मचारी अधिकाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू झाल्यानंतर सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 पर्यंत काम करावे लागणार आहे. पालिकेत ड वर्गात काम करणारे शिपाई, हमाल, कामगार यांना सकाळी 9.30 ते 6.30 पर्यंत काम करावे लागणार आहे.

दुपारी 1 ते 2 या वेळेत केवळ अर्धा तास जेवणाची सुट्टी मिळणार आहे. पाच दिवसांचा आठवडा लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना केवळ 8 नैमित्तिक रजा मिळणार आहेत. या रजा इतर रजांना मिळून घेता येणार आहेत.

5 दिवसांच्या आठवड्याचा फायदा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना मिळणार नाही. ज्या कार्यालयात रोटेशन पद्धतीने सुट्टी दिली जात होती, त्या कार्यालयांचे कामकाज सुरळीत चालू राहावे म्हणून खाते प्रमुख, उपायुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्या परवानगीने कर्मचाऱ्यांना सुट्ट्या देण्यात याव्यात असे पत्रकात म्हटले आहे.

Leave a Comment