
नवी दिल्ली – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव भारतात वाढताना दिसतो असून कारण भारतातील या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे. या व्हायरसचे दोन नवे रुग्ण दिल्ली आणि हैदराबाद येथे आढळून आले आहेत. या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ज्या देशांमध्ये कोरोना व्हायरसचा परिणाम झाला आहे, तिथून हे रुग्ण प्रवास करुन भारतात दाखल झाले आहेत.
दिल्ली आणि हैदराबादमध्ये आढळले कोरोनाचे दोन नवे रुग्ण
त्याचबरोबर राजस्थानमध्ये तिसरा संशयित रुग्ण आढळून आल्याचे तेथील अधिकृत आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एका इटलीच्या पर्यटकाची राजस्थानमध्ये कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (एनआयव्ही) या रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या रुग्णाची प्राथमिक चाचणी निगेटिव्ह आली होती त्यानंतर पुन्हा चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली आहे.
सध्या सफदरजंग रुग्णालयात विशेष स्वतंत्र वॉर्डमध्ये दिल्लीत आढळून आलेल्या रुग्णावर उपचार सुरु आहेत. तो इटलीला जाऊन आला आहे. या व्हायरसचा मोठा प्रादुर्भाव इटलीमध्ये झाला असून आतापर्यंत तिथे १६९४ रुग्ण आढळून आले आहेत तर त्यांपैकी ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती व्हिएन्नामार्गे एअर इंडियाच्या विमानाने २५ फेब्रुवारी रोजी दिल्लीत दाखल झाली आहे.
तर गेल्या आठवड्यात हैदराबादमधील कोरोनाचा रुग्ण हा दुबईहून भारतात परतला. आजवर दुबईत कोरोनाची लागण झाल्याची १९ प्रकरणे समोर आली आहेत. २० फेब्रुवारीला ही व्यक्ती दुबईहून हैदराबादला परतल्यानंतर २२ फेब्रुवारीला ती बंगळूरूला गेली त्या व्यक्तीने तिथे पाच दिवस काम केल्यानंतर २७ फेब्रुवारीला पुन्हा हैदराबादला पोहोचली.
