राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांचा सूनेबाबत गौप्यस्फोट


मुंबई – सूनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित, दुसरा मुलगा आनंद आणि त्यांची पत्नी शीतल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विद्या चव्हाण यांनी यावर प्रतिक्रिया देत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे. आमच्या निदर्शनास सूनेच्या मोबाईलमधील चॅट आणि अन्य काही बाबींवरून तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समोर आले. यासंदर्भातील सर्व पुरावे माझ्या मुलाने गोळा केल्यानंतर आम्हाला या संपूर्ण प्रकाराची कल्पना दिली. घटस्फोटासाठी त्याने वकीलांशी संपर्कदेखील साधल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

मला उगाचच नवरा बायकोच्या वादात भोवण्यात आले. दुसरी मुलगी झाली म्हणून करण्यात आलेले आरोप हे चुकीचे असून दुसऱ्या मुलीलाही आम्ही तळाहाताच्या फोडाप्रमाणे जपल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महिलांचे प्रश्न सोडवण्याचे मी कायम काम केले आहे. कायदा दुधारी शस्त्र आहे. त्याचा गैरवापरही होऊ शकतो. परंतु कोणी त्याचा चुकीचा वापर करत असेल तर त्याला कदाचित याचे परिणाम भोगावे लागतील याची कल्पना नसावी. हा लढा कायदेशीर मार्गाने सुरू राहिल, असेही त्यांनी नमूद केले.

विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित, दुसरा मुलगा आनंद आणि त्यांची पत्नी शीतल यांच्याविरोधात सूनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. विलेपार्ले पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. १६ जानेवारी रोजी विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. भादंवि कलम ४९८ अ, ३५४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३६ अन्वये सूनेचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment