पुणे – पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील ‘मी सावरकर’ वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलताना अभिनेते शरद पोंक्षे यांनी अस्पृश्यता निवारणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता वादंग सुरू झाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अस्पृश्यता निवारणात योगदान मोठे असून सावरकरांचे योगदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यापेक्षा श्रेष्ठ असल्याचे पोंक्षे म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी पोंक्षे यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देत वेळेवर औषध घेण्याचा सल्ला दिला आहे. अभिनेते शरद पोंक्षे यांनी देशातील अस्पृश्यता निवारणाबाबत व्यक्त केलेल्या मतामुळे विवादाला तोंड फुटले आहे.
अमोल मिटकरींनी घेतला पोंक्षेंच्या अस्पृश्यता निवारणाच्या वक्तव्याचा समाचार
अभिनेते शरद पोंक्षे यांनी कार्यक्रमात बोलताना सावरकरांचे योगदान श्रेष्ठ असल्याचे म्हटले. सावरकरांचे अस्पृश्यता निवारणात मोठे योगदान आहे. अस्पृश्यता निवारणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यापेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे. डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले हे त्या-त्या जातीत जन्माला आल्याने त्यांना अपमानाचे चटके बसल्यामुळे विद्रोह करत प्रवाहाविरोधात लढले. पण अस्पृश्यतेचा कोणताही चटका बसला नसतानाही सावरकर ब्राह्मणाविरोधात उभे राहतात. समाजातील जातीच्या भिंती फोडण्यासाठी आयुष्य व्यतीत करतात. त्यामुळे दोन्ही राष्ट्रपुरुषांपेक्षा सावरकर श्रेष्ठ असल्याचा दावा पोंक्षे यांनी केला होता.
पोंक्षे, म. फुलेंनी तुमच्या अनेक पिढ्यांचा उद्धार केलाय. फुले आणि बाबासाहेबांचा द्वेष करणारी तुमची हलकट प्रवृत्ती जाता जात नाही. आजारपणामुळे डोक्यावर परिणाम झाल्याचे जाणवते आहे. औषध वेळेवर घेत चला. वेळेवर दवापाणी नसलं की मेंदूवर परिणाम होतो.
— Amol mitkari (@amolmitkari22) March 1, 2020
राष्ट्रवादीचे सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी अस्पृश्यता आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी शरद पोंक्षे यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर दिले आहे. यासंदर्भात ट्विट करून मिटकरी यांनी टीका केली आहे. पोंक्षे, म. फुलेंनी तुमच्या अनेक पिढ्यांचा उद्धार केला. फुले आणि बाबासाहेबांचा द्वेष करणारी तुमची हलकट प्रवृत्ती जाता जात नाही. आजारपणामुळे डोक्यावर परिणाम झाल्याचे जाणवते आहे. औषध वेळेवर घेत चला. वेळेवर दवापाणी नसले की मेंदूवर परिणाम होतो, असा उपरोधिक सल्ला मिटकरींनी पोंक्षे यांनी दिला आहे.
यावर मिटकरी यांच्याबरोबरच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही मिश्किल भाष्य केले आहे. सावरकरांचे अस्पृश्यता निवारणात योगदान फुले-आंबेडकरांपेक्षा श्रेष्ठ असणे असे म्हणणे म्हणजे अभिनयात अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांच्यापेक्षा शरद पोंक्षेंचे योगदान श्रेष्ठ म्हणण्यासारखे असल्याचे सावंत म्हणाले.