मुलीच्या 9 दिवसांच्या लग्नसोहळ्यावर भाजप मंत्री खर्च करणार 500 कोटी?


बंगळुरु : सध्या देशभर भारतीय जनता पक्षाचे कर्नाटकातील संकटमोचक म्हणून ख्याती प्राप्त आणि आरोग्य मंत्री बी. श्रीरामुलु यांच्या मुलीच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या समारंभातही या लग्नात होणारा खर्च हा झाला नसेल. जनार्दन रेड्डी यांनी केलेल्या खर्चापेक्षा जास्त पुढच्या आठवड्यात होणाऱ्या या लग्नसोहळ्यामध्ये होणारा खर्च हा असणार आहे. हा लग्नसोहळा तब्बल नऊ दिवस चालणार आहे. जनार्दन रेड्डी यांनी 2016 मध्ये मुलीच्या लग्नात 500 कोटी रुपये खर्च केले होते. त्यानंतर आता 500 कोटी रुपये श्रीरामुलु खर्च करणार आहेत.

हैदराबादमधील उद्योगपती रवी कुमार याच्याशी आरोग्य मंत्री श्रीरामुलु यांची मुलगी रक्षिताचे लग्न होणार आहे. दिग्गज नेत्यांची या सोहळ्यामध्ये उपस्थिती असणार आहे. 500 पुजाऱ्यांना लग्नासाठी आमंत्रित केले आहे. बंगळुरुत त्यांच्या मुक्कामाची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर 1 लाख पाहुण्यांना या लग्नाचे आमंत्रण देण्यात येईल. यासाठी खास पत्रिका देखील छापल्या आहेत.

लग्नपत्रिका छापताना त्यात आरोग्याची विशेष काळजी घेतली आहे. केसर, कुंकू, हळद पावडर आणि अक्षता ठेवण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना श्रीरामुलु यांनी निमंत्रण दिले आहे. हा विवाह सोहळा जवळपास 40 एकरात पसरलेल्या पॅलेस ग्राउंडवर संपन्न होणार आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून या विवाह सोहळ्याची तयारी सुरु आहे. यात भव्य असा सेट उभारण्यात येत आहे. या विवाह सोहळ्यासाठी हम्पीच्या विरुपाक्ष मंदिरासह अनेक मंदिरांसारखा सेट उभारण्यात येणार आहे. मांड्यातील मेलुकोटे मंदिराच्या प्रतिकृतीचा खास सेट उभा करून त्याठिकाणी लग्न होणार आहे. यासाठी 200 लोकांना फक्त फुलांची सजावट करण्याच्या कामासाठी नेमण्यात आले आहे. हा सेट बॉलिवूडमधील प्रसिद्ध आर्ट डायरेक्टर तयार करत आहेत. त्याचबरोबर नवरीमुलीच्या मेकअपसाठी दीपिका पादुकोनचा मेकअप करणाऱ्या आर्टिस्ट आणि लग्नाच्या व्हिडिओ-फोटो शूटसाठी अंबानी परिवाराच्या कार्यक्रमात काम केलेल्या फोटोग्राफरला नेमण्यात आले आहे.

कर्नाटकात श्रीरामुलु यांची भाजपचे संकटमोचक अशी ओळख आहे. कर्नाटकात अशक्य असलेले भाजपचे सरकार जनार्दन रेड्डी आणि श्रीरामुलु यांनी स्थापन केले. जनार्दन रेड्डी यांच्या साथीने वाल्मिकी समाजाचे नेते श्रीरामुलु यांनी काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांना फोडले आणि येडियुरप्पा यांचे सरकार स्थापन केले. त्यांना या सरकारमध्ये आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली.

Leave a Comment