इंदुरीकरांच्या एका वक्तव्याचे किती भांडवल करणार, किती वाद घालणार?


शिर्डी – आपल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण, त्यांच्या वक्तव्यावरुन अजूनही तृप्ती देसाई आक्रमक असून त्यांनी आपल्या वकिलामार्फत इंदुरीकर महाराजांना नोटीस पाठवली आहे. आता जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी यावर इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ वक्तव्य करत जगा आणि जगू द्या, असे आवाहन केले आहे. अजून किती दिवस एका वक्तव्याचे किती भांडवल करणार, किती वाद घालणार? त्यांनी काही खून केला नसल्याचे सिंधुताई म्हणाल्या.

सिधुताई सपकाळ कोपरगाव शहरात नगरपालिकेच्या वतीने महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित व्याख्यानाला आल्या होत्या. सिंधुताई यांनी आईच्या काळजातून या विषयावर व्याख्यान झाल्यावर पत्रकारांशी संवाद साधताना इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याबाबत जगा आणि जगू द्या, असे आवाहन केले आहे. अजून किती दिवस एका वक्तव्याच किती भांडवल करणार? किती वाद घालणार?, असा सवाल करत त्यांनी काही खुन केला नाही. इंदुरीकर महाराजांचे मोठे योगदान असून अनेक व्यसनाधीन तरुण इंदुरीकरांच्या प्रबोधनाने चांगल्या मार्गाला लागले आहेत. माणसातील माणुस त्यांनी घडवला आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली असल्यामुळे आता किती वाद वाढवणार? जगा आणि जगू द्या, अशी भावनिक साद सिंधुताई सपकाळ यांनी इंदुरीकर विरोधकांना घातली आहे.

Leave a Comment