आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट


मुंबई – राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार उदयास आल्यानंतर महाराष्ट्र निर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षातील जवळीक वाढू लागली असून गेल्या अनेक दिवसांपासून हे दोन्ही पक्ष एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. त्यातच आता रविवारी भाजप आमदार आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. तासभर चाललेल्या या चर्चेनंतर मनसे-भाजप युतीची चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाली आहे.

सध्या राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकाबाजूला तर, दुसऱ्या बाजुला भाजप-मनसे असे चित्र आहे. असे असले तरी भाजप आणि मनसेमध्ये कोणतीही अधिकृत आघाडी नसली तरी, दोन्ही पक्षांमध्ये राजकीय जवळीक मात्र वाढत चालल्याचे बोलले जाते. हिंदुत्वाची राज ठाकरे यांनी धरलेली कास आणि मध्यंतरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली चर्चा यातून राज ठाकरेंचा मनसे पक्ष भाजपच्या मैत्रीकडे झुकत असल्याच्या चर्चा आहेत.

मुंबई महापालिकेच्या २०२२ मध्ये निवडणुका होणार आहेत. मनसे आणि भाजप त्याआधी राजकीय मोट बांधण्यासाठी आणि शिवसेनेला मुंबईत धक्का देण्यासाठी एकत्र येण्याची शक्यता असल्यामुळेच भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्यातील चर्चा वाढू लागलेल्या दिसत आहेत. शेलार यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे यांच्यामध्ये झालेली ही दुसरी भेट आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रविवारी सायंकाळी अंबरीश मिश्र हे राज ठाकरे यांची मुलाखत घेणार आहेत. त्यापूर्वीच भाजप नेत्याची ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.

Leave a Comment