चर्मकार समाजाचा अवमान केल्याप्रकरणी इंदुरीकरांविरोधात तक्रार दाखल


मुंबई – संतती प्राप्त होण्यासाठी सम-विषमचा फॉर्म्युला इंदुरीकर महाराजांनी एका कीर्तनात मांडल्यानंतर संकटात सापडलेले इंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चर्मकार समाजाचा इंदुरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात अवमान केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडी आणि चर्मकार समाजाने मुंबईतील वर्तक नगर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास करुन योग्य ती कारवाई करु असे तक्रारकर्त्यांना म्हटले आहे.

आपल्या कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी चर्मकार समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच चर्मकार समाजाचा त्यांनी अवमान केला आहे. सुतार समाजाबाबतही त्यांनी अशाच प्रकारचे वक्तव्य केल्याचे तक्रारकर्त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. पोलिसांनी तपास करणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी महिलांची माफी मागावी अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी केली आहे. इंदुरीकर महाराजांनी माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करु, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Leave a Comment