कोरोनामुळे जगभरातील अब्जाधीशांचे एका आठवड्यात तब्बल 36 अरब डॉलर्सचे नुकसान


नवी दिल्ली – चीनमधील कोरोना व्हायरसमुळे मृतांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होण्यासोबत त्याची लागण झाल्याची नवी प्रकरणे समोर येत असून कोरोना व्हायरस हा आतापर्यंत 50 पेक्षा जास्त देशात पसरला आहे. नागरिकांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर या व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

याच पार्श्वभुमीवर शुक्रवारी सेनसेक्समध्ये इतिहासात दुसऱ्यांदा सर्वाधिक मोठी 1448 अंकांनी घसरण झाल्यामुळे जगातील अन्य शेअर बाजावर याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. गेल्या आठवड्यात अमेरिका मार्केट डाउ जोन्समध्ये 12 टक्क्यांनी घसरण झाल्याने 2008 च्या मंदीनंतर सर्वात जास्त फटका कोरोना व्हायरसचा शेअर मार्केटला बसल्याने गुंतवणूकदारांसह अब्जाधीशांचे पैसे सुद्धा त्यात बुडाले.

या आठवड्यात जगातील टॉप-5 अब्जाधीशांचे 36 अरब डॉलर्सचे नुकसान झाले आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत आणि अॅमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस यांच्या संपत्तीला 12 अरब डॉलर्सचे नुकसान झाले आहे. बेजोस हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेले आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीचे बिल गेट्स यांच्या संपत्तीला 5.7 अरब डॉलर्सचे नुकसान झाले आहे. त्यांची एकूण संपत्ती 112.6 अरब डॉलर्स आहे.

बर्कशायर हॅथवे यांच्या वॉरेन बफेट याला एकूण 6.1 अरब डॉलर्सचे नुकसान तर फेसबुकचे फाउंडर मार्क झुकेरबर्ग यांना 7 अरब डॉलर्सचे नुकसान झाले आहे. टेस्लाचे सीईओ एलन मास्क यांना एकूण 6.8 अरब डॉलर्सचे नुकसान झाले आहे. नुकसान झाल्याप्रकरणी मास्क हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. यांची एकूण संपत्ती 71.4 अरब डॉलर्स आहे.

Leave a Comment