आता मनसे देखील शिवसेनेप्रमाणे तिथीनुसार साजरी करणार शिवजयंती


मुंबई – राज्यात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी करत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेवर नाराज झालेल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पक्षाचा झेंडा बदलत हिंदुत्वाची कास धरल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष शिवसेनेच्या आणखी एका कृतीचे अनुकरण करणार आहे.

आता मनसे देखील शिवसेनेप्रमाणे शिवजयंती तिथीनुसार साजरी करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना तसे आदेश कृष्णकुंज येथे शनिवारी झालेल्या बैठकीत दिले. विशेष म्हणजे येत्या १२ मार्च रोजी मनसे शिवजयंती तिथीनुसार साजरी करणार असून, औंरगाबाद येथे ही शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील या शिवजंयतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

अवघ्या काही महिन्यांवर औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक आलेली असून, शिवसेनेला या महानगरपालिकेत टक्कर देण्यासाठी आतापासूनच मनसे तयारीला लागली असल्यामुळे मनसेने औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक लक्षात घेता तिथीनुसार शिवजयंती औरंगाबादमध्ये साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे मनसेने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही बदल केले असून, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी शिवसेनेतून मनसेमध्ये प्रवेश केलेल्या हर्षवर्धन जाधव आणि सुहास दशरथे यांच्याकडे देण्यात आलेली आहे. कन्नड आणि सिल्लोड विधानसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष पद हर्षवर्धन जाधव यांच्याकडे तर औरंगाबाद शहरातील विधानसभेच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सुहास दशरथे यांच्यावर देण्यात आलेली आहे. दरम्यान सुमित खांबेकर यांना मात्र जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे.

या दोन्ही महानगरपालिका निवडणुकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष केंद्रीत केले असून, औरंगाबाद आणि नवी मुंबई येथे मनसेचे मुंबईतील पदाधिकारी आणि नेत्यांची फौज जाणार आहे. राज ठाकरे यांनी तसे आदेशच दिले आहेत.

Leave a Comment