‘वन मील अ डे’ (OMAD) डायट आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम


आजकाल निरनिराळ्या कारणांमुळे लोक निरनिराळ्या पद्धतीच्या आहारपद्धतींचा अवलंब करीत असतात. यामध्ये काही विशिष्ट आजारामुळे, कुठल्या प्रकारच्या विशिष्ट अॅलर्जी ( उदाहरणार्थ ग्लुटेन किंवा लॅक्टोज अॅलर्जी ), किंवा वजन घटविण्यासाठी अथवा वाढविण्यासाठी तऱ्हेतऱ्हेच्या आहारपद्धतींचा स्वीकार केला जात असतो. या सर्वांमध्ये वजन घटविण्यासाठी अनेक आहारपद्धती लोकप्रिय आहेत. याच आहारपद्धतींमध्ये सध्या ‘वन मील अ डे’ (OMAD) ही आहारपद्धत सध्या लोकप्रिय होताना पहावयास मिळत आहे. या पद्धतीमध्ये दिवसात केवळ एकदाच भोजन घ्यायचे असून, हे भोजन शक्यतो रात्रीच्या वेळी घ्यावे लागते. बाकी संपूर्ण दिवसभर काहीही न खाल्ले जाण्याचे बंधन या आहारपद्धतीअंतर्गत पाळणे आवश्यक असते. या आहार पद्धतीच्या माध्यमातून डायट करणाऱ्या व्यक्तीने संपूर्ण दिवसभरात केवळ एक हजार कॅलरीज भोजनाच्या द्वारे सेवन करायच्या असतात. अश्या रीतीने दिवसभराच्या कामामध्ये शरीरातील खर्च होणाऱ्या कॅलरीजच्या मानाने भोजनामार्फत शरीरामध्ये येणाऱ्या कॅलरीज पुष्कळ कमी असल्याने ‘कॅलरी डेफिसिट’ तयार होऊन त्याद्वारे वजन झपाट्याने कमी होऊ लागते. या आहारपद्धतीमुळे वाढलेले वजन झपाट्याने कमी होत असले, तरी अश्या प्रकारच्या डायटचे काही दुष्परिणामही दिसून येण्याची शक्यता असते.

स्थूल मनुष्याने झपाट्याने वजन कमी करणे हे आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने अयोग्य मानले गेले आहे. आहारतज्ञांच्या देखरेखीखाली आखलेला सुनियोजित आणि संतुलित आहार व नियमित व्यायाम यांच्या मदतीने महिन्याभरामध्ये साधारण तीन ते पाच किलो वजन घटविणे योग्य मानले गेले आहे. OMAD डायटच्या मदतीने वजन झपाट्याने कमी होते खरे, पण जेव्हा हे डायट बंद करून एखादी व्यक्ती पुन्हा पहिल्याप्रमाणे आहार घेऊ लागते, तेव्हा कमी झालेले वजन तितक्याच लवकर परत वाढू लागते. कोणत्याही आहाराची आखणी करताना तो केवळ वजन कमी करण्याच्या दृष्टीने आखला न जाता, कमी झालेले वजन पुन्हा वाढू नये आणि शरीराला आवश्यक ते पोषणही मिळावे या दृष्टीने आखला जाणे महत्वाचे असते.

रात्रीच्या भोजनाच्या नंतर साधारण दोन तासांनी व्यक्ती निद्रिस्त होते. झोपेमध्ये शरीराची पचनक्रिया मंदावते. अश्या वेळी संपूर्ण दिवसभराचे भोजन रात्री झोपण्यापूर्वी केले गेले असता, पचनाशी निगडित समस्या उद्भवू शकतात. तसेच खाल्लेले अन्न पचविण्यासाठी शरीराला जास्त मेहनत घ्यावी लागते. अश्या वेळी हृदयापासून आतड्यांपर्यंत सर्वच अवयवांवर त्याचा ताण पडू शकतो. यामुळे उच्चरक्तदाब, वारंवार पित्त होणे अश्या समस्या उद्भवण्याचा धोका उत्पन्न होतो. त्यामुळे या आहारपद्धतीचा स्वीकार करायचाच असेल, तर रात्रीचे भोजन झोपण्यापूर्वी किमान तीन तास आधी घेणे आवश्यक आहे. या आहारपद्धतीमध्ये दिवसातून केवळ एकदाच, ते ही रात्रीच्या वेळी भोजन करायचे असते. दिवसभराच्या कामाच्या गडबडीत शरीराला अन्नामार्फत आवश्यक उर्जा न मिळाल्याने थकवा, अशक्तपणा जाणवू शकतो. तसेच भूक न शमल्याने चिडचिड होणे, मन एकाग्र न होणे, मूड स्विन्ग्ज या समस्याही उद्भवू शकतात.

अश्या प्रकारच्या आहार पद्धतीमुळे शरीरातील ब्लडशुगर लेव्हल्सवर थेट परिणाम होत असल्याने उच्चरक्तदाब, मधुमेह असणाऱ्यांसाठी ही आहारपद्धती अयोग्य असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे. तसेच दिवसभराच्या केवळ एकाच भोजनाद्वारे शरीराला माफक कॅलरीज मिळत असल्याने शरीर कॅलरीज साठवू लागते. परिणामी शरीराची चयापचय शक्तीही कमी होते. दीर्घ काळामध्ये याचे मोठे दुष्परिणाम भोगावे लागण्याची शक्यता असल्याचेही तज्ञांचे मत आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment