
नुकताच अमेरिकेत पार पडलेल्या ‘अमेरिका गॉट टॅलेंट’ या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून वसई-भाईंदरच्या कलाकारांनी या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत सर्वोत्तम कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
मुंबईच्या गल्ली बॉयने पटकवला ‘अमेरिका गॉट टॅलेंट’चा प्रथम क्रमांक
वसई-भाईंदर येथील ‘व्ही अनबिटेबल’ डान्स ग्रुपला या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली होती. ‘अमेरिका गॉट टॅलेंट’मध्ये मागच्या वेळीही त्यांनी सहभागी होऊन स्थान पटकावले होते. पण त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पार पडलेल्या दुसऱ्या पर्वात या स्पर्धकांनी चित्तथरारक नृत्याविष्कार सादर करून अमेरिकेच्या रसिकांची मने जिंकली.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, कॅनडा या देशांसह विविध देशांतील ४० संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यामधून ‘व्ही अनबिटेबल ग्रूप’ने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. या नृत्यपथकाला ज्यावेळी प्रथम क्रमांक मिळाल्याची घोषणा झाली, त्यावेळी परीक्षकांसह प्रेक्षकांनी उभे राहून टाळय़ांच्या गजरात या स्पर्धकांचे कौतूक केले.
यापूर्वी भारतातील विविध स्पर्धेत सहभागी होत या स्पर्धकांनी आपले नृत्य कौशल्य दाखवले आहे. हे स्पर्धक चित्तथरारक व श्वास रोखायला लावणारे स्टंट व नृत्य यांसाठी प्रसिद्ध असून मुंबईच्या उपनगरातील नायगाव व भाईंदरमधील ३० मुलांचा ‘व्ही अनबिटेबल ग्रूप’मध्ये समावेश आहे. स्वप्निल भोईर व ओमप्रकाश चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलांनी आपली कला सादर केली.
