आनंद महिंद्रांनी सांगितला कमी जागेत गाडी पार्क करण्याचा जुगाड


आपण नेहमीच पाहत आलो आहोत की, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे ट्विटरवर कायमच आपल्या ट्विटमुळे चर्चेत असतात. आनंद महिंद्रा अनेकदा या माध्यमातून मिळालेल्या सुचना आणि सल्ले गांभीर्याने घेतात. त्यामुळेच त्यांना अनेकजण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये टॅग करुन भन्नाट गोष्टींकडे त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. आनंद महिंद्रा यापैकी काही ट्विट रिट्विट करत त्यावर भाष्य करतात. त्यांनी नुकताच असाच एक व्हिडिओ ट्विट केला आहे. कमी जागेत पार्किंग करणाऱ्या भारतीयांनी केलेला एक भन्नाट जुगाड या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला आहे.


भारतीयांच्या हुशारीला मर्यादा नाही, अशा कॅप्शनसहीत एक व्हिडिओ रोहित अग्रवाल या व्यक्तीने शेअर केला आहे. एका गल्लीएवढ्या आकाराच्या प्रवेशद्वारामधून चार चाकी गाडी येताना या व्हिडिओमध्ये दिसते. चक्क एक प्लॅटफॉर्म ही गाडी पार्क करण्यासाठी तयार करण्यात आल्याचे दिसते. लोखंडाचा हा प्लॅटफॉर्म गाडी आतमध्ये येण्याआधी बाहेर काढला जातो. या प्लॅटफॉर्मला खालून चाके बसवण्यात आली आहेत. बाहेर काढण्यात आलेल्या या लोखंडी जाळीसारख्या दिसणाऱ्या प्लॅटफॉर्मवर गाडी चढवल्यानंतर गाडीला धक्का देत पार्किंगमध्ये ढकलली जाते. गाडी या लोखंडी प्लॅटफॉर्ममुळे पार्क करताना सतत तिला पुढे मागे घेत अंदाज घेण्याची गरज पडत नाही आणि कमी जागेत गाडी पार्क करता येते.

हे ट्विट महिंद्रांनी कोट करुन रिट्विट केले आहे. तुमच्याकडे जेव्हा हलचाल करण्यासाठी कमी जागा असेल अशावेळेस काय करावे? मर्यादा असताना भारतीयांकडे त्यावर भन्नाट उत्तर शोधून काढण्याचे कौशल्य आहे यात शंकाच नसल्याचे महिंद्रांनी हा व्हिडिओ ट्विट करताना म्हटले आहे. जुगाड करण्यात भारतीयांचा हात कोणीच धरु शकत नसल्याचे मत महिंद्रांच्या या ट्विटवर अनेकांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment