काशी महाकाल एक्स्प्रेसमधील त्या आरक्षित जागेवरुन मोदींवर ओवेसींनी साधला निशाणा


हैदराबाद – रविवारपासून वाराणसीहून इंदोरसाठी काशी महाकाल एक्स्प्रेस सुरू करण्यात आली असून या ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. भगवान शंकरासाठी या एक्स्प्रेसमध्ये एक सीट कायमची आरक्षित ठेवण्यात आली असून देव्हाऱ्यासारखे स्वरुप त्या जागेला देण्यात आले आहे. आता त्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांना भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची ओवेसींनी ट्विट करत आठवण करून दिली आहे. ओवेसी यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे एक्स्प्रेसमधील सीटचे मंदिरात रूपांतरण करण्यात आक्षेप नोंदवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांयकाळी काशी वाराणसीहून इंदोरसाठी जाणाऱ्या काशी महाकाल एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. २० फेब्रुवारीपासून ही ट्रेन नियमित सुरू होत आहे. पण, या एक्स्प्रेसमधील B5 डब्यातील सीट क्रमांक ६४ वर भगवान शंकराचे छोटे मंदिर उभारण्यात आले आहे. हूबेहूब देव्हाऱ्यासारखे स्वरूप या सीटला देण्यात आले आहे. B5 मधील ६४ क्रमांकाचे सीट कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितल्यामुळे सध्या चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Comment