दिल्ली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पाचही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त


मुंबई – शिवसेनेने दिल्लीत आम आदमी पक्षाने मिळवलेल्या विजयाचे तोंडभरून कौतुक केले असले तरी दिल्लीत फारशी चमकदार कामगिरी याच शिवसेनेला करता आलेली नाही. शिवसेनेच्या सगळ्याच उमेदवारांवर डिपॉझिट जप्त होण्याची वेळ दिल्लीत आली. तर एका उमेदवाराला केवळ ११५ मतांवर समाधान मानावे लागलं आहे. त्याच मतदारसंघात नोटाला मिळालेली मते यापेक्षा जवळपास पाचपट आहेत.

शिवसेनेने अरविंद केजरीवाल यांच्या विजयाचे सामनाच्या अग्रलेखातून ”आपमतलब्यां’चा पराभव झाला. केजरीवाल यांच्या झाडूने सगळय़ांना साफ केले, अशा शब्दांत कौतुक केले आहे. दिल्लीत याच शिवसेनेचे पाच शिलेदार नशिब आजमावत होते. पण, जनतेने या पाचही जणांवर पराभवाचा शिक्का मारला. डिपॉझिट देखील हे पाचही उमेदवार वाचवू शकले नाहीत.

शिवसेनेकडून धरम वीर नावाचे उमेदवार दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुराडी मतदारसंघातून लढत होते. काही प्रमाणात जनतेचा पाठिंबा त्यांना मिळाला. तब्बल १८ हजार ४४ मते धरम वीर यांना मिळाली. बुराडी या मतदारसंघात ते तिसऱ्या स्थानावर होते. आम आदमी पार्टीच्या संजीव झा यांचा बुराडीमध्ये मोठा विजय झाला.

करोल बाग मतदारसंघातून शिवसेनेने गौरव नावाचा उमेदवार दिला होता. तर १९२ मतेच त्याला मिळाली आहेत. याच ठिकाणी नोटाला ४४७ मते मिळाली आहेत. म्हणजेच शिवसेनेच्या उमेदवाराला या मतदारसंघात नोटाएवढेही मते मिळू शकली नाहीत. विशेष रवी यांचा या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या विजय झाला. भाजपच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.

अनिल सिंग जादोन यांना शिवसेनेने चांदणी चौक मतदारसंघात आजमावले. पण त्यांचाही काहीच करिष्मा दिसून आला नाही. केवळ २४२ मते अनिल सिंग यांना मिळाली. शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा या मतदारसंघातही नोटाला मिळालेली मते अधिक आहेत. २६३ मते नोटाला या मतदारसंघात मिळाली आहेत.

शिवसेनेच्या तिकिटावर संजय गुप्ता विकासपुरी मतदारसंघातून मैदानात होते. ४२२ मते त्यांना मिळाली. येथेही नोटीची मते शिवसेनेला मिळालेल्या मतांच्या तुलनेत दुप्पट होती. नोटाला १०३४ मते मिळाली आहेत. मालविया नगर येथून शिवसेनेने मोबिन अली यांना उमेदवारी दिली होती. त्यांनाही ११५ मतांवर समाधान मानावे लागलं. नोटाला त्यांच्यापेक्षा जवळपास पाचपट मते मिळाली आहेत.

Leave a Comment