लव्ह आज कलमधील इंटिमेट सीनवर सेन्सॉर बोर्डाची कात्री


येत्या व्हॅलेंटाइन डेला (१४ फेब्रुवारी) सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचा बहुचर्चित ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे कार्तिक-सारा मिळून जोरदार प्रमोशन करत आहेत. नुकतेच या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ‘अ’ प्रमाणपत्र देत त्यातील काही इंटिमेट सीनवर कात्री चालवली आहे.

सेन्सॉर बोर्डाने दिग्दर्शकांना सारा आणि कार्तिक यांचे चित्रपटातील काही इंटिमेट सीन काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. सारा-कार्तिकच्या किसिंग सीनला कात्री लावण्यासोबतच काही प्रणयदृश्ये ‘ब्लर’ करण्यास सांगितले आहे. सारा आणि कार्तिक इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या दोघांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. सारा-कार्तिकचा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एक किसिंग व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. सेन्सॉर बोर्डाने आता किसिंग सीनलाच कात्री लावल्याने पुन्हा एकदा तो व्हिडीओ व्हायरल होत आहे.

रणदीप हुडा आणि आरुषी शर्मा यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सैफ अली खान आणि दीपिका पादुकोणची मुख्य भूमिका असलेला ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट याआधी २००९ मध्ये रिलीज झाला होता. आता सारा-कार्तिकच्या चित्रपटाची संकलप्ना जरी तशीच असली तरी दोन वेगवेगळ्या पिढ्यांची कथा यामध्ये दाखवण्यात आल्याचे दिग्दर्शक इम्तियाज अली म्हणाला.

Leave a Comment