बहुतांशी भारतीयांमध्ये बी१२ जीवनसत्वाची कमतरता


जीवनसत्वे आपल्या आहारातील महत्वपूर्ण घटक आहेत. शरीरातील निरनिराळ्या अवयवांच्या बिनचूक कार्यासाठी निरनिराळ्या जीवनसत्वांची आवश्यकता असते. यामध्ये बी१२ हे जीवनसत्व अतिशय महत्वाचे आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन नुसार बहुतांशी भारतीयांमध्ये बी१२ जीवनसत्वाची कमतरता असल्याचे दिसून आले आहे. शरीरातील नर्व्हस टीश्यू, एकंदर शारीरिक आरोग्य, मेंदूचे कार्य आणि लाल रक्त कोशिकांचे निर्माणकार्य या सगळ्यांसाठी बी१२ जीवनसत्वाची आवश्यकता असते. हे जीवनसत्व डीएनए, आरएनए आणि न्युरोट्रान्समीटरच्या उत्पादनामध्येही मदत करते.

शरीरामध्ये बी१२ जीवनसत्वाची कमतरता जास्त काळ झाल्यास शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतात. मानसिक दृष्ट्या व्यक्ती चिडचिडी होऊ लागते. तसेच व्यक्तीच्या मनस्थितीमध्ये देखील अचानक बदल होतात, व्यक्ती क्षणात आनंदी, तर दुसऱ्या क्षणाला उदास होते. शारिरीक आरोग्याच्या बाबतीत सांगायचे झाले तर हातापायांना सतत मुंग्या येणे, हातापायांचे स्नायू अकारण आखडणे, थकवा, स्मृति भ्रंश, दृष्टी दोष, सतत तोंड येणे, बद्धकोष्ठ, मेंदूचे विकार अश्या अनेक तक्रारी उद्भवू लागतात.

आपल्या शरीरामध्ये दर मिनिटाला लाखो लाल रक्त कोशिकांचे निर्माण होत असते. पण जर शरीरामध्ये बी१२ जीवनसत्वाची कमतरता असेल, तर ह्या कोशिकांचा विकास नीट होत नाही, आणि त्यामुळे अनिमिया होण्याची शक्यता निर्माण होते. आईच्या दुधावर अवलंबून असलेल्या काही अर्भकांमध्ये बी१२ जीवनसत्वाची कमतरता आढळून येते, कारण त्यांना वरचे अन्न सुरु केले नसल्याने इतर कोणत्याही आहारातून पोषण मिळण्याचा संभव नसतो. संपूर्ण शाकाहारी असणाऱ्या व्यक्तींमध्येही बी१२ जीवनसत्वाची कमतरता असू शकते. मानसिक तणाव, जेवणाच्या अनियमित वेळा आणि सवयी, आतड्यांशी निगडीत विकार यांच्यामुळे शरीरामध्ये बी१२ जीवनसत्व नीट शोषले जात नाही. हे जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळणारे असल्याने, पाणी पिणे कमी असल्याने ही हे जीवनसत्व शरीरामध्ये शोषले जात नाही.

शरीरामध्ये बीए१२ जीवनसत्वाची कमतरता आहे किंवा नाही, हे रक्ताच्या तपासणीद्वारे स्पष्ट होऊ शकते. पूर्ण रक्त गणना ( सीबीसी ) आणि रक्तामध्ये बी१२ चे स्तर किती आहे याच्या परीक्षणाने जीवनसत्वाची कमतरता आहे किंवा नाही याचे निदान केले जाऊ शकते. जर रक्ततपासणीनंतर शरीरामध्ये बी १२ जीवनसत्वाची कमतरता असल्याचे निदान झाले, तर अश्या व्यक्तींना तज्ञांकडे पाठविण्याची आवश्यकता असते. त्या व्यक्तीला जाणवत असलेल्या तक्रारी लक्षात घेऊन त्याप्रमाणे उपाययोजना करणे अगत्याचे असते. म्हणजे, जर पचनासंबंधी विकार असतील तर गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट, शरीरामध्ये रक्तकोशिकांविषयी समस्या असतील तर हेमॅटोलॉजिस्ट यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

शरीरामध्ये बी१२ जीवनसत्वाची कमतरता दूर करण्यासाठी काही उपाय करता येतील. ज्या व्यक्तींना मद्यपान करण्याची सवय असेल, त्यांनी ह्या सवयीवर नियंत्रण ठेवावयास हवे. मद्याच्या अतिसेवनामुळे जठराचे कार्य विस्कळीत होते, तसेच आतड्यांच्या लायनिंग ला नुकसान होते. त्यामुळे बी१२ जीवनसत्व शरीरामध्ये व्यवस्थित शोषले जाऊ शकत नाही. तसेच धूम्रपानामुळेही शरीरामध्ये जीवनसत्व शोषले जाण्यात अडथळे निर्माण होतात.

आपला आहार संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करावाच, पण त्याशिवाय जीवनसत्वांचे सप्लिमेंट्स घेणे हा ही पर्याय स्वीकारावा. त्यामुळे आहारातून जी जीवनसत्वे आणि इतर पोषक द्रव्ये शरीराला मिळत नाहीत, ती या सप्लिमेंट द्वारे मिळू शकतात. मात्र सप्लिमेंट डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी. याशिवाय आहारामध्ये सोयाबीन युक्त पदार्थांचे प्रमाण वाढवावे, व ज्या अन्नपदार्थांमध्ये जीवनसत्वे अधिक आहेत त्यांचा समावेश आपल्या आहारात करावा.

आपल्या आहारामध्ये बी६ जीवनसत्व असणाऱ्या अन्नपदार्थांचे प्रमाण वाढवावे. या जीवनसत्वामुळे बी१२ जीवनसत्व शरीरामध्ये शोषले जाण्यास मदत मिळते. पालक, अक्रोड, अंडी, केळी या अन्नपदार्थांमध्ये बी६ हे जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment