
यंदाचा The Academy Awards म्हणजेच ऑस्कर 2020 पुरस्कार सोहळा अमेरिकेतील डॉल्बी थिएटर येथे पार पडणार आहे. प्रत्येक देशातील सेलिब्रिटी अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी तयार होत असतानाच हा पुरस्कार सोहळा ज्या ठिकाणी पार पडणार आहे, तेथेसुद्धा एक न्यारा थाट पाहायला मिळत आहे.
तुम्हाला माहित आहे ऑस्करसाठी अंथरलेल्या रेड कार्पेटची किंमत
जगभरातील अवघ्या मनोरंजन विश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये रेड कार्पेट शोबद्दल देखील कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी यंदाच्या वर्षी अंथरण्यात आलेल्या रेड कार्पेट अर्थात लाल रंगाच्या मखमली सतरंजीवजा कापडाचीही चर्चा रंगली आहे.
तब्बल १८ कामगारांनी यंदाच्या वर्षी ऑस्कर सोहळ्याच्या निमित्ताने अंथरल्या जाणाऱ्या रेड कार्पेटसाठी मेहनत घेतली असून, ऑस्कर सोहळा होत असणाऱ्या ठिकाणावर अक्षरश: ९०० तासांच्या मेहनतीनंतर ही लाल रंगाची सतरंजी अंथरली गेली. तब्बल २० लाख रुपयांचा खर्च अतिभव्य अशा या रेड कार्पेटसाठी करण्यात आला आहे. ज्यावरुनच जगभरात गाजलेले सेलिब्रिटी आणि अफलातून कलाविष्कार साजरा करणारी मंडळी मुख्य सभागृहात जातील. विशेष म्हणजे त्यांचे अनोखे असे फोटोशूटही रेड कार्पेटवरच होणार आहे. त्याचबरोबर या रेड कार्पेटच्या संरक्षणासाठीही ठराविक व्यवस्था करण्यात आली आहे.
