बुश फायर सामन्यात पाँटिंग एकादशचा अवघ्या एका धावेने विजय


मेलबर्न – रिकी पाँटिंगच्या संघाने ऑस्ट्रेलियात बुश फायर रिलीफ फंडसाठी झालेल्या सामन्यात अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या संघावर एक धावाने विजय मिळवला. गिलख्रिस्टच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पाँटिंगच्या संघाने १० षटकात ५ बाद १०४ धावा केल्या होत्या. विजयासाठी १०५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या गिलख्रिस्ट संघाला १० षटकात ६ बाद १०३ धावांपर्यंत मजल मारता आली.

वेस्ट इंडिजचा महान डावखुरा फलंदाज ब्रायन लाराने पाँटिंग संघाकडून खेळताना सर्वाधिक ३० धावा केल्या. त्याने ११ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३० धावा केल्या. तर कर्णधार पाँटिगने नाबाद २६ धावा आणि मॅथ्यू हेडनने १६ धावा केल्या. गिलख्रिस्ट संघाकडून शेन वॉटसनने ३० धावा केल्या. त्याने ९ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकार लगावले. सायमंड्सने १३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह २९ धावा केल्या. भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहला ६ चेंडूत २ धावा करता आल्या.

दरम्यान, भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या सामन्यात रिकी पाँटिंग संघाचा प्रशिक्षक होता. या सामन्याच्या माध्यमातून मिळालेला पैसा ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या आगीतील पीडितांना दिला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटर एलिस पेरीने सचिन तेंडुलकरला एक षटक फलंदाजी करण्याची विनंती केली. तो तेव्हा पुन्हा हातात बॅट घेऊन मैदानात उतरला. पाँटिंग एकादश आणि गिलख्रिस्ट एकादश यांच्यातील चॅरिटी सामन्यातील इनिंग ब्रेकदरम्यान सचिनने एलिसच्या गोलंदाजीचा सामना केला. त्याने तिच्या पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार लगावला.

Leave a Comment