धनाढ्य तानाशाहांची ही अपत्ये


जागतिक इतिहासामध्ये तानाशाह म्हटले की हिटलर, मुसोलिनी, सद्दाम हुसेन, गद्दाफी अशी अनेक नावे आपल्या डोळ्यांसमोर येतात. या सर्वच तानाशाहांनी आपापल्या कारकीर्दीमध्ये आपल्या देशातील लोकांवर हुकुमत गाजविली, आणि त्याचबरोबर अपार संपत्ती गोळा केली. या तानाशाहांचे आयुष्य कसे होते, त्यांची राजवट कशी होती या बद्दल खूप काही लिहिले गेले, बोलले गेले. पण या तानाशाहांची अपत्ये कोण होती, कशी होती या बद्दल फारसा उल्लेख केला जात नाही. या धनाढ्य तानाशाहांच्या मुलांची आयुष्ये देखील त्यांच्या पित्याप्रमाणेच सूड, कपट कारस्थानांनी भरलेली होती. जर्मनीचा तानाशाह हिटलर याने आपल्या मुलाचा स्वीकार कधीच केला नाही, तर इटलीचा तानाशाह मुसोलिनी याची मुलगी त्याच्याच विरोधात उभी राहिली. सद्दाम आणि गद्दाफी यांची मुले आपापल्या पित्यांप्रमाणेच वागली.

रोमेनियाचा तानाशाह निकोल काउसेकू याचा मुलगा निकू हा ही वडिलांप्रमाणेच कट्टर कम्युनिस्ट होता. निकोलच्या तानाशाही मुळे रोमेनियातील लोकांचे स्वातंत्र्य संपुष्टात येऊन, अनेकांना त्या देशातून पलायन करावे लागले होते. निकू हा मद्यपी आणि स्त्रियांवर अत्याचार करणारा म्हणून ओळखला जात असे. निकोल मारला गेल्यानंतर निकूला ही तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्या दरम्यानच त्याचा मृत्यू झाला.

एक्वेटर गिनी हा मध्य आफ्रिकेतील लहानसा देश आहे. येथे तानाशाह टेओडोरो एमबासोगोची राजवट होती. याने १९७९ साली आपल्या काकांची हत्या करून सत्ता काबीज केली होती. तेव्हापासून ह्या देशावर त्याचेच शासन आहे. त्याच्यावर अनेक लोकांची हत्या आणि कैदेमध्ये असलेल्या कैद्यांवर अत्याचार केल्याचे अनेक आरोप आहेत. त्याचा मुलगा टेओडोरो मन्गुए सध्या देशाचा उपराष्ट्रपती असून त्याला चिम्पान्झी पाळण्याचा आणि महागड्या गाड्या वापरण्याचा शौक आहे.

इटलीचा तानाशाह मुसोलिनी आणि त्याची मुलगी एडा यांचे नाते मोठे विचित्र होते. एडाच्या पतीने मुसोलिनीच्या तानाशाहीचा नेहमी विरोध केला, त्यामुळे मुसोलिनीने त्याला तुरुंगवासाची शिक्षा फर्माविली. तुरुंगवासातच मुसोलिनीने आपल्या जावयाची हत्या करविली. ही घटना एडाला समजताच तिने सूड उगवायचा निश्चय केला. एडाने इटलीहून स्वीडन ला पलायन केले आणि तिथे तिने कम्युनिस्ट नेत्यांबरोबर संधान जुळविले. हे गोष्ट मुसोलिनीला समजताच त्याने आपल्या हेरांकरवी एडाची हत्या करविली. युद्धाच्या काळात लिहिल्या गेलेल्या रोजनिशी इटलीच्या बाहेर गुपचूप पाठविण्यात एडाचा हात होता. जेव्हा युद्ध संपुष्टात आले, आणि या डायरीज लोकांच्या समोर आल्या, तेव्हा इटलीतील लोकांना किती अत्याचार सहन करावे लागले याची कल्पना इतरांना आली.

हिटलरला जागतिक इतिहासामध्ये सर्वात क्रूर तानाशाह मानले गेले आहे. हिटलरने स्वतःच्या परिवाराला देखील तितक्याच क्रौर्याने वागविले. हिटलरचे एका फ्रेंच महिलेची प्रेमसंबंध होते. त्या संबंधांतून त्याला एक मुलगा देखील होता. पण या मुलाचा स्वीकार हिटलरने कधीच केला नाही. या महिलेने लिहिलेल्या ‘ युअर फादर वॉज हिटलर ‘ या पुस्तकामध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे. आपल्या आईच्या मृत्यनंतर हिटलरच्या मुलाने, म्हणजेच लॉरेटने हिटलरशी निगडीत अनेक स्थळांना भेटी दिल्या. पुढे त्याचा विवाह झाला, पण त्याची खरी ओळख समजल्यानंतर त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेली. लॉरेट ने फ्रेंच रेल्वे मध्ये नोकरी केली आणि तिथूनच तो सेवानिवृत्तही झाला. त्याचे वंशज अजूनही फ्रान्समध्ये वास्तव्यास आहेत.

अमेरिकन सेनेने सद्दामला इराक मधून बेदखल करेपर्यंत सद्दामचा मुलगा उदय हा सद्दाम नंतर येणारा तानाशाह समाजला जात असे. सद्दामच्या कारकीर्दीत उदय ने अनेक लोकांच्या हत्या करविल्या. स्त्रियांवर अत्याचार, हत्या, जबरदस्तीने खंडणी वसूल करणे असे अनेक गंभीर आरोप उदय वर होते. इराकच्या महिला ऑलिम्पीयन्स आणि महिला फुटबॉल पटूंच्या बलात्काराचे आरोपही उदयवर होते. आपल्या पित्याच्या पर्सनल टेस्टरची देखील उदयने हत्या केली होती. २००३ साली अमेरिकेने केलेल्या हल्ल्यामध्ये उदय मारला गेला.

मुअमार गद्दाफी हा देखील अतिशय क्रूर तानाशाह होता. तो जनतेवर करीत असलेल्या अनेक भयंकर अत्याचारांच्या बातम्या वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होत असत. त्याचा मुलगा मुतस्सिम हा देखील लीबियामधील क्रूर तानाशाह म्हणून ओळखला जात असे. आपल्या पित्याच्या वतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याने प्रतिनिधित्व देखील केले आहे. लिबिया मध्ये जेव्हा बंड झाले तेव्हा त्यामध्ये या पितापुत्रांची हत्या करण्यात आली.

Leave a Comment