
नवी दिल्ली – सर्वात आधी चीनमधील जीवघेण्या कोरोना व्हायरसची माहिती देणाऱ्या डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या डॉक्टरचे ली वेनलियांग असे नाव असून कोरोनाची ली वेनलियांग यांना लागण झाली होती. त्यांचा गुरुवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. चीनमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 600 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 30 हजाराहून अधिक नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
सर्वात आधी कोरोनाची माहिती देणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू
यासंदर्भातील वृत्त ग्लोबल टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, सर्वात आधी चीनला कोरोना व्हायरसचा धोका असल्याचा इशारा 34 वर्षीय डॉक्टर ली वेनलियांग तसेच इतर 8 जणांनी दिला होता. पण यातील ली वेनलियांग यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे गुरुवारी त्यांचा वुहान शहरामधील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. वुहान शहराला कोरोना व्हायरसचा धोका सांगणारे ली वेनलियांग पहिले डॉक्टर होते.
वुहान सेंट्रल रूग्णालयात ली वेनलियांग हे कार्यरत होते. 30 डिसेंबर रोजी काही डॉक्टरांशी कोरोना व्हायरससंदर्भात ली यांनी चर्चा केली होती. पण पोलिसांनी ली यांना नोटीस जारी करत सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवण्याचा आरोप केला होता. चीनमध्ये आतापर्यंत 30 हजारांहून अधिक नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे चीनमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
