चीनचा हा ब्रँड भारतात ‘नंबर वन’


नवी दिल्लीः पहिल्यांदाच स्मार्टफोन आणि फीचरफोन्समध्ये चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमी भारताचा नंबर वन हँडसेट ब्रँड बनला असून दिग्गज कंपनी सॅमसंगवर शाओमीने मात केली आहे. सॅमसंग गेल्या अनेक वर्षापासून अव्वलस्थानी कायम होती. ही माहिती मार्केटमध्ये ऑक्टोबर-डिसेंबर आयडीसी डेटामधून समोर आली आहे. उर्वरित सर्व स्मार्टफोन आणि फीचर फोन सेलमध्ये कंपन्यांना शाओमीच्या स्मार्टफोन्सने मागे टाकले आहे.

शाओमीचे १६ टक्के मार्केट शेअर गेल्यावर्षीच्या चौथ्या आणि अखेरच्या तिमाहीत वाढले असून ते टॉपवर आहेत. ही माहिती आयडीसीच्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. दुसऱ्या स्थानावर सॅमसंग तर तिसऱ्या स्थानावर जिओ आहे. या डेटामध्ये मार्केटमध्ये सध्या असलेल्या स्मार्टफोन्स आणि फीचर फोन या दोन्हीचा समावेश आहे. परंतु, शाओमीकडून अद्याप कोणताही फीचर फोन लाँच करण्यात आला नाही.

या रिपोर्टमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या कंपन्याचे मार्केट शेअर किती आहेत हे सांगितलेले नाही. सॅमसंग आणि रिलायन्सचे फीचर फोन्स व स्मार्टफोन्सची एकूण संख्या एकत्र केली तरी त्या संख्येपेक्षा शाओमीच्या फोनची विक्री अधिक झाल्याची माहिती शाओमी इंडियाचे मुख्य आणि ग्लोबलचे उपाध्यक्ष मनू जैन यांनी दिली आहे.

शाओमीची २०१९ मध्ये वार्षिक विक्री ४३.६ मिलियन राहिली. शाओमी सध्या स्मार्टफोनच्या बाजारात नंबर वनवर आहे. २०१९ मध्ये शाओमीचे मार्केटमधील शेअर २८ टक्के राहिले. २०१८ च्या तुलनेत ते ५ टक्क्यांनी वाढले आहे. चीनपेक्षा सर्वात मोठी विक्री भारतात झाली. स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये सॅमसंगचा मार्केट शेअर २१ टक्के राहिला.

Leave a Comment