वारकरी परिषदेचा शरद पवारांनी घेतला आपल्या शैलीत समाचार


पुणे : आळंदीतील जोग महाराज पुण्यतिथी सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज विठ्ठलाच्या, माऊलीच्या आणि तुकोबांच्या दर्शनासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही. तसे जर कुणाला वाटत असेल आणि कुणी परवानगी नाकारण्याची भाषा करत असेल तर त्याला वारकरी संप्रदायाचा विचार समजलाच नाही. तो सच्चा वारकरीच नसल्याचा सणसणीत टोला वारकरी परिषदेला हाणला.

राष्ट्रीय वारकरी परिषदेने काही दिवसांपूर्वीच शरद पवार हे हिंदूविरोधी असून ते नेहमीच हिंदू धर्माला विरोध करतात. रामायणाला विरोध करतात. नास्तिक मंडळींना पाठिंबा देतात. त्यामुळे वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला त्यांना बोलावू नका, असे आवाहन केले होते. त्याबाबतचे एक पत्रक वारकरी परिषदेचे वक्ते महाराजांनी प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या आजच्या सोहळ्यात पवार काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते.

आपल्या खास शैलीत पवारांनी वारकरी परिषदेचा समाचार घेतला. विठ्ठलाला भेटायला पंढरीला जायचे असते. आळंदीला माऊलीच्या दर्शनाला जायचे असते आणि देहूला तुकोबांसाठी जायचे असते. तिथे जायला परवानगी नसल्याचे कुणी सांगत असेल तर त्यांना वारकरी संप्रदायाचा विचारच समजला नाही. असा विचार करणारा सच्चा वारकरी नसल्याचे मला वाटते. पण अशा गोष्टी होत असतात. लहानसहान गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे असते, असा चिमटा देखील पवारांनी काढला.

Leave a Comment