अजित पवारांचे गुटखाबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश


मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात गुटखाबंदी लागू असली तरी सर्रास गुटख्याची विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुटखाबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील गुटखाविक्रीच्या सूत्रधारांना शोधून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे. गुटखा व प्रतिबंधित खाद्यपदार्थांचा साठा किंवा वाहतूक होताना ज्याक्षेत्रात आढळून येईल, तेथील अन्न व औषध प्रशासन अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी, खर्रा, मावा यांसारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन तसेच विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यात गुटखाबंदी आघाडी सरकारच्या काळात लागू करण्यात आली, त्याची कडक अंमलबजावणीही झाल्यामुळे गुटखाकंपन्या राज्याबाहेर गेल्या. परराज्यांच्या सीमेवरुन अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर गुटखा आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांची राज्यात आयात केली जात आहे. राज्यात त्यांची साठवणूक होते. कधीकधी हा माल पकडलाही जातो आणि वाहनचालकांवर कारवाई होते, परंतु सूत्रधारांना धक्का लागत नाही.

गुटखामाफियांवर वचक निर्माण होत नाही. राज्यात यापुढच्या काळात गुटखाबंदीची राज्यात कडक अंमलबजावणी होईल. त्यासाठी या व्यापारातील सूत्रधारांना ‘मोक्का’ लावून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विचार करण्यात येईल. अन्न व औषध प्रशासन, पोलिस व परिवहन विभागाचे अधिकारी समन्वयाने कारवाई करतील. गुटखाविक्रीला संरक्षण देताना जे अधिकारी आढळतील त्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अजित पवार यांनी दिला.

राज्यात येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. अधिकाऱ्यांना त्यासाठी प्रोत्साहन द्यावे. गुटखा विक्रीसंदर्भातील माहिती मिळवण्यासाठी खबऱ्यांचे जाळे भक्कम करण्यात यावे, अशा सूचनाही अजित पवार यांनी दिल्या. अन्न व औषध प्रशासनाला त्यासाठी निधी वाढवून देण्याचेही त्यांनी मान्य केले. गुटखाबंदीबाबत जिल्हास्तरावर विविध विभागांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

सध्या राज्यात विक्री होत असलेल्या गुटखा आणि प्रतिबंधित सुपारी, मावा, खर्रा यांच्या ब्रँडची नावेही या बैठकीत त्यांनी वाचून दाखवली आणि त्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. यापुढच्या काळात गुटखाविक्रीच्या अवैध व्यवसायात असलेल्या कंपन्यांच्या मालकांना आणि मुख्य सूत्रधारांना शोधून थेट त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. यामुळे शालेय विद्यार्थी तसेच तरुण गुटख्याच्या दुष्परिणामापासून वाचतील, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.

Leave a Comment