शरद पवारांच्या संस्थेला ठाकरे सरकारने दिली 51 हेक्टर जमीन


मुंबई : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जागा देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय वादात सापडला असून जालना जिल्ह्यात या संस्थेला राज्य सरकारने 51 हेक्टर जमीन दिली आहे. या संस्थेशी शरद पवार हे संबंधित असून त्यामुळेच सर्व नियम डावलून हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला आहे. शरद पवारांवर ठाकरे सरकार हे मेहेरबान झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. गेल्या 7 वर्षांपासून या संस्थेला जमीन देण्याचा प्रस्ताव हा प्रलंबित आहे. यावर महसूल, विधी आणि न्याय विभागाने या आधी आक्षेप घेता होता. पण सरकारने हे सर्व आक्षेप धुडकावत हा निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे.

पण ही ऊस संशोधनासाठी जमीन वापरण्यात येणार असल्याने नियमांना अपवाद करून हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. याबाबतच्या प्रस्तावाला बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आता यावरून राजकारण होत असून भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने आली आहे. तर यावरून भाजप शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. निर्णय न झाल्यामुळे 2017मध्ये ही जमीन महसूल खात्याकडे जमा झाली होती.

दरम्यान भाजपचे आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलीक यांनी फेटाळून लावले आहेत. ही जमीन संशोधनासाठी वापरणार असून त्यामुळे निर्णयात काहीही चूक नसल्याचे म्हणत शेतकऱ्यांना या संस्थेचा फायदा होईल असेही म्हटले आहे.

Leave a Comment