करण जोहरने शेअर केली ‘तख्त’ची पहिली झलक


आघाडीची स्टारकास्ट घेऊन बॉलिवूडचा डॅडी अर्थात दिग्दर्शक करण जोहर हा भव्यदिव्य असा ‘तख्त’ चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची घोषणा मागच्या वर्षी करण्यात आली होती. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेटसोबतच चित्रपटाची पहिली झलक शेअर करण्यात आली आहे.

रणवीर सिंह, करिना कपूर खान, आलिया भट्ट, विकी कौशल, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर यांची मुख्य भूमिका ‘तख्त’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी २४ डिसेंबरला रिलीज होणार आहे. दरम्यान करण जोहरने काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनचा फोटो शेअर केला होता. ताजमहल समोर उभे राहून एक फोटो घेतला. हेच आपले आगामी ‘तख्त’ चित्रपटाचे लोकेशन असणार असल्याचे त्याने सांगितले होते.


मार्च महिन्यात ‘तख्त’ चित्रपटाच्या शूटींगच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. शाहजहाचा पहिला मुलगा दारा शिकोह आणि तिसरा मुलगा औरंगजेब यांच्यातील लढाईची या चित्रपटाची कथा आहे. रणवीर सिंह दारा शिकोहची भूमिका साकारणार आहे तर विकी कौशल औरंगजेबच्या भूमिकेत दिसणार आहे. आलिया यात विकी कौशलसोबत ऑन्सक्रीन रोमांस करताना दिसणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती हिरू यश जोहर, करण जोहर आणि अपूर्वा मेहता हे करणार आहेत. तर, हा चित्रपट करण जोहरच्या दिग्दर्शनाखाली तयार होणार आहे. ऐतिहासिक कथानकावर आधारित बिग बजेट चित्रपट आणि त्यासोबतच मोठी स्टारकास्ट यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली आहे.

Leave a Comment