२०० कोटींचा टप्पा पार करत ‘तान्हाजी’ने रचला विक्रम


रिलीज झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर अजय देवगनचा ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाने बाजी मारण्यास सुरुवात केली होती. हा चित्रपट १० जानेवारीला रिलीज झाला होता. ट्रेलरला प्रेक्षकांच्या मिळालेल्या प्रतिसादानंतर चित्रपटालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाने अवघ्या १५ दिवसात २०० कोटी कमाई करून नव्या वर्षात पहिला विक्रम रचला आहे.


बॉक्स ऑफिसवर यंदा वर्षाच्या सुरुवातीलाच ‘छपाक’ आणि ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ चित्रपटांमध्ये तगडी शर्यत पाहायला मिळाली. तान्हाजीने या शर्यतीतून भरारी घेत बॉक्स ऑफिसवर बक्कळ गल्ला जमवायला सुरुवात केली होती. या चित्रपटाने आठवडाभरातच १०० कोटींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही भरघोस कमाई करून २०० कोटींचा आकडा पार केला आहे.

हा चित्रपट महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. त्याचाही फायदा या चित्रपटाला झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांचे एकनिष्ठ मावळे तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा पडद्यावर पाहायला मिळाली. दिग्दर्शक ओम राऊत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अजय देवगनसह सैफ अली खान, शरद केळकर आणि काजोल यांचीही महत्वपूर्ण भूमिका यामध्ये आहे. नववर्षातील हा पहिलाच हिट चित्रपट ठरला आहे.

Leave a Comment