स्वयंघोषित बाबा नित्यानंदविरोधात इंटरपोलची ब्ल्यू कॉर्नर नोटीस


अहमदाबाद : इंटरपोलने स्वयंघोषित बाबा नित्यानंदविरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस काढल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली. नित्यानंदविरोधात कर्नाटकात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या वर्षी तो भारताबाहेर पळून गेला आहे. नित्यानंदच्या आश्रमातून दोन मुली बेपत्ता झाल्यानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गुजरात पोलिसांनी त्याच्याविरोधात दाखल गुन्ह्याच्या आरोपपत्रात याबाबत माहिती दिली आहे.

वृत्तसंस्थेला पोलिस अधीक्षक के. टी. कामरिया यांनी सांगितले की, वादग्रस्त नित्यानंदविरोधात इंटरपोलने याच महिन्यात ब्ल्यू कॉर्नर नोटीस काढली आहे. पोलिसांनी नित्यानंदविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस काढावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

नित्यानंदचा बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास लागू शकलेला नाही. पोलिस आणि तपास यंत्रणांना कोणताही सुगावा लागू न देता महिला शिष्यांवर बलात्काराचा आरोप असलेला नित्यानंद देश सोडून पळून गेला आहे. त्याचबरोबर त्याने एक व्हिडिओ प्रकाशित करत तपास संस्थांना जणू एक प्रकारे आव्हानच दिले होते. नित्यानंदने या व्हिडिओ संदेशात म्हटले होते की, कोणतेही न्यायालय त्याला शिक्षा देऊन खरे बोलण्यापासून रोखू शकत नाही. तो भगवान शंकराचा अवतार असून हे सत्य तो जगाला सांगू इच्छितो, असा त्याने दावा केला होता.

कर्नाटकातही शिष्यांवर अत्याचार केल्याचा गुन्हा नित्यानंदवर दाखल आहे. २०१८ मध्येच त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. तो नेपाळमार्गे विना पासपोर्ट पळून गेल्याचा तपास यंत्रणा संशय आहे. नित्यानंद पळून गेल्याचे समजल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने सर्व देशांमधील भारतीय वकिलातींना सतर्क केले आहे. एखाद्या गुन्ह्याच्या तपासासाठी एखाद्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी किंवा त्याची माहिती मिळवण्यासाठी ब्ल्यू कॉर्नर नोटीस काढली जाते, तर एखादा हवा असलेल्या आरोपीस अटक करण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस काढली जाते.

Leave a Comment