श्रीलंकेच्या युवा खेळाडूने टाकला क्रिकेटमधील आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू


नवी दिल्ली – क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू दक्षिण आफ्रिका येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत रविवारी टाकण्यात आल्याचा विक्रम नोंदवण्यात आला. हा विक्रम भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये नोंदवण्यात आला आहे. श्रीलंकेचा वेगवान युवा गोलंदाज मथीशा पथिराना याने १७५ किलोमीटर प्रतितास वेगाने एक चेंडू टाकल्याचे समोर आले आहे. हा चेंडू भारताचा सलामीचा फंलदाज जैयसवाल याला टाकण्यात आला.


क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगनान चेंडू श्रीलंकेचा युवा गोलंदाज मथीशा पथिराना याने खरच टाकला का? असा प्रश्न ट्विटरवर विचारला जात आहे. पण हा चेंडू खरोखरच विक्रमी वेगात टाकला की स्पीडोमीटरमध्ये काही गडबड झाली याबाबत अद्याप उलगडा झालेला नाही. त्याचबरोबर या विक्रमावर आयसीसीकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.

मथीशा पथिरानाने टाकलेला हा चेंडू लेग साइडने निघून गेला. हा चेंडू पंचांनी वाइड असल्याचा इशारा दिला. यादरम्यान टीव्ही स्क्रीनवर जेव्हा बॉलचा स्पीड दाखवला तेव्हा सर्वच जण हैराण झाले. कारण चेंडू १७५ प्रतितास वेगाने टाकल्याचे स्क्रीनवर झळकले होते. पाकिस्तानच्या शोएब अख्तरच्या नावावर क्रिकेट इतिहासात सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम आहे. २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या विरोधात शोएबने विक्रमी १६१.३ प्रतितास किलोमीटरने चेंडू टाकला होता.

Leave a Comment