तिरुपतीच्या प्रत्येक भाविकाला मोफत मिळणार लाडू


मुंबई : तिरुपती देवस्थानकडून यंदाच्या वर्षीच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्यामुळे देवस्थानाला भेट देणाऱ्या भाविकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार व्यंकटेश्वर मंदिर प्रशासनाकडून मंदिराला भेट देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रसाद स्वरुपात देण्यात येणारा तिरुपती लाडू मोफत देण्यात येणार आहे.

दररोज जवळपास ८० हजार भाविक देशातील सर्वात श्रीमंत मंदिर प्रशासन म्हणून ओळख असणाऱ्या तिरुपती देवस्थानाला भेट देतात. हाच आकडा सण- उत्सवांच्या दिवशी एक लाखांवरही पोहोचतो. भाविकांची हीच गर्दी, श्रद्धा पाहता प्रत्येकालाच प्रसाद स्वरुपातील हा प्रसिद्ध असा ‘तिरुपती लाडू’ मिळावा या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

तीन प्रकारचे लाडू तिरुमला मंदिर देवस्थानकडून प्रसादम स्वरुपात तयार करण्यात येतात. ज्यामध्ये मोठे, लहान आणि प्रसादम लाडूंचा समावेश असतो. एकूण ३ हजार लाडू मंदिर प्रशासनाकडून मोठ्या आकाराचे दररोज तयार करण्यात येतात. ज्यामध्ये एक लाडू हा ७०० ग्रॅम वजनाचा असतो. यापैकी काही लाडू हे तिकीट धारकांना ठराविक अर्जित सेवेसाठी मोफत देण्यात येतात. तर, इतर ला़डू हे व्हीव्हीआयपींसाठी नगास २०० रुपये दराने विकण्यात येतात. तर, लहान लाडू हे १७५ ग्रॅम वजनाचे असतात. दर दिवशी असे जवळपास ३ लाखांहून अधिक लाडू तयार करण्यात येतात. मंदिरय प्रशासनाला हे लाडू तयार करण्यासाठी प्रती नग ३९ रुपये एवढा खर्च येतो.

Leave a Comment