रविवारपासून साईबाबांची शिर्डी बेमुदत बंद


शिर्डीः येत्या रविवारीपासून शिर्डी बंदची हाक साईबाबा जन्मस्थळाचा वाद उकरून काढणाऱ्या मराठवाड्यातील पाथरी ग्रामस्थांच्या कृतीचा निषेध करण्यासाठी संतप्त शिर्डीकरांनी दिली आहे. ग्रामस्थांनी शनिवारी आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी तातडीची ग्रामसभा बोलावली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंबंधी तातडीने लक्ष घातले असून ते शिर्डी ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत

मराठवाड्याच्या दौ-यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे असताना साईबाबांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी काही लोकांनी केल्यानंतर राज्य सरकारने साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीच्या विकासासाठी विकास आराखडा तयार केला असून त्याचे भूमिपूजन लवकरच केले जाईल, अशी घोषणा केल्यानंतर देश विदेशातील साईभक्तांमध्ये मोठी खळबळ माजली आहे. त्याचबरोबर यावरुन शिर्डी ग्रामस्थही आक्रमक झाले आहेत.

साईचरित्रात साईबाबांचा जन्म, धर्म याबाबत स्पष्ट लिहलेले असतानाही साईबाबांच्या जन्मस्थानाचे अनेक ठिकाणी दावे केले जात असून त्यातून साईबाबांच्या सर्वधर्म समभावाच्या विचारालाच नख लावण्याचा प्रयत्न होत असून विशिष्ट धर्मात काही लोकांनी तर साईबाबांना अडकवण्याचा प्रयत्न केला असून तो निंदनीय असल्याची भावना शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

आयुष्यभर फकिराच्या वेशात राहुन साईबाबांनी दिनदुबळ्यांची सेवा केली. सर्व धर्मसमभावाची शिकवण जगाला दिली. त्यांनी कधीही आपला धर्म, पंथ, जन्म याबाबत कोठेही वाच्छता केली नाही. साईसतचरित्र हेच साईबाबांच्या जीवन कार्याबद्दल एकमेव दस्तावेज असून त्यात कुठेही साईंच्या जन्मस्थळाचा अथवा ते कोणत्या जातीचे होते याबाबत कुठेही नोंद नाही. असे असतानाही पाथरी येथील काही प्रवृत्ति साईबाबा विशिष्ट जातीचे असल्याचा दावा करून साईभक्तांच्या भावनेला व साईबाबांच्या विचारधारेला नख लावण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या कडे साईबाबांच्या जन्मस्थळाचा कोणताही अधिकृत पुरावा नसताना सरकार साईबाबांचे जन्मस्थळ म्हणुन पाथरीचा विकास करण्याचा आक्षेप साईभक्त शिर्डीकरांनी घेतला आहे.

साईभक्त आणि शिर्डी ग्रामस्थांमध्ये साईबाबांच्या पाथरी येथील जन्मस्थळाच्या उल्लेखावरून असंतोष उसळला असून काल शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थांची बैठक झाल्यानंतर साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करणा-या पाथरी आणि अन्य ठिकाणच्या तथाकथित लोकांचा तीव्र निषेध करुन यापुढे साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करणा-यांचा सरकारने बंदोबस्त करावा यासाठी येत्या रविवारपासुन बेमुदत शिर्डी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबधी शनिवारी पुन्हा ग्रामसभा घेण्यात येणार आहे.

Leave a Comment